संक्रमण शिबिरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार 

श्रीकांत सावंत - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ठाणे - धोकादायक इमारती आणि अन्य कारणांमुळे बेघर झालेल्या ठाण्यातल्या नागरिकांची व्यवस्था पालिकेने संक्रमण शिबिरात केली आहे. शहरात असलेल्या सहा संक्रमण शिबिरांतून जवळपास 25 ते 30 हजार नागरिक राहतात; पण या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. या सुविधा मिळाव्यात यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या अनेक नागरिकांनी पालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. 

ठाणे पालिकेने गेल्या वर्षभरामध्ये अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक नागरिक विस्थापित झाले आहेत. या नागरिकांची व्यवस्था रेंटल हाऊसिंग योजनेच्या संक्रमण शिबिरामध्ये केली आहे. वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल, घोडबंदर रोड येथील तुलशीधाम, खोपट, घंटाळी, साकेत, नौपाडा येथे संक्रमण शिबिरे आहेत. या शिबिरांत प्रत्येक ठिकाणी दोन ते चार इमारती आहेत. या इमारती बाहेरून चांगल्या दिसत असल्या तरी आतमध्ये मात्र कोंबड्यांची खुराडे आहेत. येथे अनेक समस्या आहेत. या इमारतींमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्यामुळे दहा ते पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शाम सोनार यांनी दिली. खोपट येथे तर एका 165 चौरस फुटांच्या घरामध्ये दोन कुटुंबांना कोंबून ठेवल्याचा प्रकारही उघड झाला आहे. येथील नागरिकांच्या समस्यांकडे ना महापालिका प्रशासन लक्ष देत; ना लोकप्रतिनिधी. अशा वेळी त्यांच्यासाठी आम्ही मतदान का करायचे, असा सवाल उपस्थित करून या मंडळींनी मतदानावर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना या मंडळींची समजूत घालण्याची वेळ पालिका प्रशासनावर येऊन ठेपली आहे. 

मतदान कुठे करणार? 
ज्या नागरिकांची घरे धोकादायक होती, ती जमीनदोस्त करण्यात येऊन, त्यांची रवानगी संक्रमण शिबिरांत केली असून ही मंडळी त्यांच्या मूळ प्रभागापासून लांब गेली आहेत. मतदान पुनर्तपासणी कार्यक्रमावेळी काही नागरिकांची नावे रद्द झाल्याने त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला गेल्याचा प्रकार काही नागरिकांच्या बाबतीत घडला आहे. ज्यांची नावे आहेत, त्यांना इतक्‍या लांब जाऊन आम्ही का मतदान करावे, असा प्रश्‍न पडला आहे. आमची स्थिती पालिकेला माहिती असूनही त्यांनी स्वतंत्र व्यवस्था का केली नाही, असा सवाल ते उपस्थित करत आहेत. पालिका आणि लोकप्रतिनिधी आमच्यावर अन्याय करत असतील, तर न्याय कुणाकडे मागायचा? सगळ्याच पक्षांच्या मंडळींनी आमच्याकडे दुर्लक्ष केले असून आम्ही त्यांना मतदान का करायचे? असे प्रश्‍न ते उपस्थित करत आहेत. दरम्यान, संक्रमण शिबिरातील नागरिकांना बायोमेट्रिक ओळखपत्र दिले आहे; पण हे ओळखपत्र मतदानासाठी रहिवासी ओळखपत्र म्हणून वापरता येत नसल्याने त्यांना मतदान करता येणार नसल्याचे भाडेकरू संघटनेचे महेंद्र मोने यांनी सांगितले. दरम्यान, संक्रमण शिबिरामध्ये वयाची ऐंशी-नव्वदी ओलांडलेले अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना चालणेही शक्‍य नाही; त्यामुळे त्यांना मतदानासाठी इतक्‍या दूर जाणे अशक्‍य आहे.

Web Title: Citizens vote boycott