नागरिकांना मिळणार पावसाची सूचना 

नागरिकांना मिळणार पावसाची सूचना 

मुंबई -  खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी बंद केलेली पॉट होल ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या यंत्रणेचाही पुरेपूर वापर केला जाईल आणि मोठ्या पावसाची सूचना वेळीच नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर, नाले रुंदीकरणातील अडथळे दूर करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कायद्याचा वापर केला जाईल, असा "पावसाळी आराखडा' नवनियुक्त महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मांडला आहे. 

परदेशी यांनी सोमवारी (ता. 13) मावळते पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध विभागांच्या बैठका घेतल्यानंतर संध्याकाळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यात त्यांनी सध्या पावसाळी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगितले. नालेसफाई योग्य पद्धतीने सुरू असून, गेल्या वर्षीचा जास्त गाळही काढला जात आहे. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यासह छायाचित्रेही काढली जात आहेत, असे त्यांनी नमूद केले. 

मुंबईत 200 ठिकाणी पाणी तुंबते. त्यातील 30 ठिकाणची कामे सुरू झाली आहेत. उर्वरित ठिकाणचीही कामे करता येईल. ब्रिमस्ट्रोवॅडअंतर्गत नाल्याचे रुंदीकरण सुरू आहे. पण, त्यात अनेक वेळा प्रकल्पग्रस्त जागा सोडायला तयार नसल्याने काही ठिकाणी रुंदीकरण रखडले आहे. त्यासाठी "आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण' कायद्याचा वापर करून अडथळे दूर केले जातील. तर, पालिकेचे आपात्कालीन नियंत्रण कक्ष अद्ययावत असून, त्यांच्याकडे सक्षम यंत्रणा आहे. पावसाळी परिस्थितीत यंत्रणा वेगाने हलवण्यासाठी सीसी टीव्हीचा वापर करूच; पण त्याचबरोबर मोठा पाऊस असल्यास त्यांची माहिती वेळीच नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी महापालिकेने पॉट होल ट्रॅकिंग सॉफ्टवेअर तयार केले होते. त्यात फोटोसह खडड्याची तक्रार केल्यानंतर 48 तासांत खड्‌डा दुरुस्त करणे बंधनकारक होते. मात्र, माजी आयुक्त अजोय मेहता यांनी ती बंद केली होती. ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा विचार असल्याचे परदेशी यांनी सांगितले. 

चर्चेतून मार्ग काढणार 
नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या सागरकिनारी मार्गावरून सध्या वरळी येथील मच्छीमार व पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. सध्या न्यायालयात तो वाद सुरू आहे. त्याबद्दल आयुक्त प्रवीण परदेशी यांनी चर्चेतून मार्ग काढू, असा विश्‍वास व्यक्त केला. या मार्गाचे काम सुरू करण्यापूर्वीच सर्व प्रकारचा अभ्यास झाला आहे. तसेच, नागरिकांकडून सूचना व हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. मासेमारांची कोणत्याही प्रकारची अडचण या प्रकल्पामुळे होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com