शहरविकासाचे आणखी एक गाजर

शहरविकासाचे आणखी एक गाजर

उल्हासनगर - उल्हासनगर पालिकेची आर्थिक स्थिती पाहता शहराचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे जर शहराचा विकास करायचा असेल तर, आवश्‍यक प्रकल्पांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्यास केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी घेऊन शहराचा विकास, आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब, अपूर्णावस्थेतील रिंगरूटचे काम पूर्ण करणार, मालमत्ता करात सवलत अशा एक ना अनेक आश्‍वासनांची खैरात भाजपच्या जाहीरनाम्यात केली आहे. 

भाजपच्या जाहीरनाम्याचे उद्‌घाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १४) झाले. या वेळी कल्याणचे आमदार नरेंद्र जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, ओमी कलानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी उपस्थित होते. प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात उल्हासनगर शहराचा रखडलेला शहर विकास आराखडा तत्काळ संमत करून घेणे, वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करणे, सुमारे ३२२ धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी कायद्यात बदल करणे, २४ तास पाणीपुरवठा सुविधा, शहराच्या आरोग्यासाठी प्रभावी घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिःसारणाची व्यवस्था करणे आदी शहराच्या विकासासंबंधी तरतुदींचा समावेश या वचननाम्यात करण्यात आला आहे. इयत्ता दहावी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब, महिला बचत गटांसाठी बाजार, शहरात सीसी टीव्ही यंत्रणा, बहुमजली पार्किंग व्यवस्था, महापालिकांच्या शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, शहरी गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनांचा समावेश आहे. 

रिंगरूट आणि केबी रोडचा विकास
रुंदीकरणानंतर केबी रोडचे प्रलंबित असलेले काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करणे, बाधित व्यापाऱ्यांचे प्राधान्याने पुनर्वसन करणे; तसेच अपूर्णावस्थेत असलेला रिंगरूट पूर्ण करण्याला अग्रक्रम देण्यात आला आहे. बाधित होणाऱ्या झोपडपट्टींचे पुनर्वसन करून त्यानंतरच रिंगरूटचा विकास करणार असल्याचे ओमी कलानी यांनी या वेळी सांगितले. 

मालमत्ता करात सवलत
भाजपने मालमत्ता व पाणीपुरवठा करात ३३ टक्‍क्‍यांची सूट दिली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. 

क्रीडा संकुलांना प्राधान्य
चालीया मंदिराच्या विकासासाठी आवश्‍यक सुविधा; तसेच सरकारकडून निधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन भाजपच्या अजेंड्यावर आहे. खेळ संस्कृतीचा विकास करण्यासाठी उल्हासनगर पूर्व आणि पश्‍चिमेला इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा संकुल उभारण्यावर राज्यमंत्र्यानी भर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com