पनवेल शहर चकाचक

दीपक घरत
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

दररोज ६०० टन कचऱ्याची विल्‍हेवाट; घनकचरा व्यवस्‍थापन समितीला यश

पनवेल : मुसळधार पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे पाण्यासोबत वाहून आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागाने लिलया पार पाडले आहे. पालिका हद्दीत रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यासोबत पुराच्या पाण्यासोबत वाहून येणाऱ्या कचऱ्याची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्यात यश आल्याने शहर चकाचक होत आहे. 

पालिका हद्दीत कोणत्याही भागात कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीसोबत साथीचे रोग फैलावतील, अशा प्रकारची परिस्थिती उद्‌भवली नसल्याने पालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच पालिका प्रशासनाच्या घनकचरा विभागाच्या कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. दररोज निर्माण होणाऱ्या जवळपास ४०० ते ४५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासोबत अतिरिक्त १०० ते १५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला आलेल्या यशामुळे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.  

कचरा साचून होणारी बिकट परिस्थिती निर्माण होऊ न देण्यात पालिका प्रशासनाने चांगल्या उपाययोजना राबवल्या, हे मान्य करावे लागेल. 
- अमोल शितोळे, अध्यक्ष, एकता सामाजिक संस्था, कामोठे

२००५ साली आलेल्या पुरात कोल्हापूर पालिकेच्या उपायुक्तपदी असताना केलेल्या कामाचा अनुभव पनवेलमध्ये कामी आला. पूर परिस्थिती हाताळताना कोणत्या उपाययोजना राबवायच्या, याची माहिती झाली. आताच्या परिस्थितीत त्या अनुभवाची मदत झाली. 
- गणेश देशमुख, आयुक्त

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The city of Panvel is dazzling