वाशी रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन आजपासून कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मनपाच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा मंगळवारी (ता. १३) सकाळी १० वाजता कार्यान्वित होणार आहे. ही यंत्रणा चालवण्यासाठी एका खासगी संस्थेला देण्यात आली असून, खासगी सिटीस्कॅनपेक्षा कमी दरात नागरिकांना सिटीस्कॅन करता येणार आहे.

नवी मुंबई ः मनपाच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा मंगळवारी (ता. १३) सकाळी १० वाजता कार्यान्वित होणार आहे. ही यंत्रणा चालवण्यासाठी एका खासगी संस्थेला देण्यात आली असून, खासगी सिटीस्कॅनपेक्षा कमी दरात नागरिकांना सिटीस्कॅन करता येणार आहे. विशेष म्हणजे सिटीस्कॅन यंत्रणा कार्यान्वित व्हावी, म्हणून अनेकदा मनपाच्या सभेत विषय मंजुरीसाठी आले होते. मात्र, त्यास आता मुहूर्त मिळाला असून, गरिबांना त्याचा चांगला दिलासा मिळणार आहे.

गरीब व गरजू नागरिकांना वाजवी दरात सिटीस्कॅन करून कुठेही मिळत नव्हते. वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयालगत असणाऱ्या फोर्टीज रुग्णालयात कमी दरात सिटीस्कॅन करून मिळत होते; परंतु तेथील अटींची पूर्तता करण्यासाठी भयानक वेळ लागत असे, तर वाशी डेपोजवळ असणाऱ्या एक खासगी सिटीस्कॅन सेंटरमध्ये दरात अपेक्षित अशी सूट मिळत नव्हती. त्यामुळे अनेक गरीब व गरजू रुग्ण सिटीस्कॅन करण्यास धजावत नव्हते. त्यासाठी मनपाच्या रुग्णालयात सिटीस्कॅन बसावावे, यासाठी प्रशासन तयारीत होते. यासाठी २००७ पासून मनपाच्या महासभेत विषय मंजुरीसाठी येत होते. परंतु, सत्ताधाऱ्यांकडून सिटीस्कॅनबाबत अपेक्षित असे सहकार्य होत नसल्याने महासभेत मंजूर झालेला सिटीस्कॅन यंत्रणेचा प्रस्ताव मंजूर होऊनही स्थायी समितीमध्ये येण्यास २०१९ उजाडले.

महासभेत दरास मंजुरी
सिटीस्कॅन यंत्रणा २४ तास चालू असणार असून, मे. रुबी एलकेअर सर्व्हिसेस संस्थेला कंत्राट दिले गेले आहे. सिटीस्कॅन करतानाचे दर महासभेने व स्थायी समितीने मंजूर केले आहेत. जे दर मंजूर करण्यात आलेले आहेत, ते दर खासगी सिटीस्कॅनपेक्षा तुलनेने कमी असल्याने गरीब व गरजू रुग्णांना याचा चांगलाच फायदा होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिटीस्कॅन मशीनचा आज लोकार्पण सोहळा असून, ही सुविधा सर्वांसाठी मोफत असणार आहे. त्यामुळे शहरातील गरजूंना खूप फायदा होणार आहे. 
- डॉ. बाळासाहेब सोनावणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CityScan machine at Vashi Hospital operates from today