सिव्हील रुग्णालय अत्याचार प्रकरण ; आरोपीविषयी पोलिसांनी मागविली माहिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

सिव्हील रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या कल्याण, गवळीपाडा येथील महिलेला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. पीडित मुलगी आईला भेटण्यासाठी गुरुवारी दुपारी वडिलांसोबत रुग्णालयात आली होती.

ठाणे : ठाण्यातील सिव्हील रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या आईला भेटण्यासाठी आलेल्या सहा वर्षांच्या मुलीवर तेथील सुरक्षारक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी हरीश नरवार (वय 52, रा. कळवा) याला अटक केली. शनिवारी पोलिसांनी सिव्हील रुग्णालयाला पत्र पाठवून आरोपीची संपूर्ण माहिती मागवली असून, रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयाच्या अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. माकोडे यांनीही याला दुजोरा दिला. 

सिव्हील रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या कल्याण, गवळीपाडा येथील महिलेला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. पीडित मुलगी आईला भेटण्यासाठी गुरुवारी दुपारी वडिलांसोबत रुग्णालयात आली होती. पाणी आणण्यासाठी ती रुग्णालयातील तळमजल्यावर गेल्यावर तेथील प्रसूतिगृहाबाहेर बसलेल्या हरीशने तिला एका खोलीत नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. मुलीने हा प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून नरवारला अटक केली.

याआधी नरवार याने असे कारनामे केलेत का, याचीही चौकशी पोलिस करत आहेत. त्याच्याविषयीच्या माहितीसाठी पोलिसांनी सिव्हील रुग्णालयाला पत्र पाठवले आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून नरवार याच्या सहकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती सुधारली असून, ती सुखरूप असल्याची माहिती सिव्हील रुग्णालयातील डॉक्‍टरांनी दिली.  

 
 

Web Title: Civil hospital torture case Police asked the accused about the detail