'ती' ऑडिओ क्‍लिप माझीच : मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 मे 2018

मुंबई : राजकरणात स्फोट घडवणारी ऑडिओ क्‍लिप माझीच असली ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्‍लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसईतील सभेत स्पष्ट केले. दुसरीकडे ही क्‍लिप मोडून तोडून सादर केली असेल तर भाजपने न्यायालयात जावे, असे आव्हान शिवसेनेने दिले आहे. 

मुंबई : राजकरणात स्फोट घडवणारी ऑडिओ क्‍लिप माझीच असली ती मोडून तोडून सादर केली. आता ती पूर्ण क्‍लिप निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसईतील सभेत स्पष्ट केले. दुसरीकडे ही क्‍लिप मोडून तोडून सादर केली असेल तर भाजपने न्यायालयात जावे, असे आव्हान शिवसेनेने दिले आहे. 

भाजपच्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद वापरण्याचा मुख्यमंत्री सल्ला देत असल्याची ऑडिओ क्‍लिप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभेत ऐकवली. त्यावरून राजकरण तापले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर पलटवार करताना सांगितले, की ती ऑडिओ क्‍लिप 14 मिनिटांची आहे. ठाकरे यांनी पुढची वाक्‍येच ऐकवली नाहीत. 

मुख्यमंत्र्यांनी वसईतील सभेत ती संपूर्ण क्‍लिप ऐकवली. त्यावेळी पूर्वी जी बाळासाहेबांची शिवसेना होती, ती आता शिव विरोधसेना झाली आहे, असा टोलाही लगावला. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या ऑडिओ टेपमधील मुख्यमंत्र्याच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आवाहन करतानाच अशा प्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दादागिरीची भाषा वापरत असतील तर हे राज्याच्या सुसंस्कृतपणाला शोभणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्ले करण्याची चिथावणीखोर भाषा वापरली असून त्यांच्यावर कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. 

साम दाम दंड भेद याचा अर्थ कूटनिती असा होतो. सत्ता पक्ष आहोत, सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही, असे या क्‍लिपमधील शेवटचे वाक्‍य होते. ते त्यांनी ऐकवले नाही. ते ऐकवले असते, तर शिवसेना तोंडावर पडली असती. त्या क्‍लिपमध्ये काही आक्षेपार्ह आढळले, मी दोषी आढळलो तर माझ्यावर कारवाई करा. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

ऑडिओ क्‍लिपची भाजपने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शहनिशा करावी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही बेजबाबदार विधाने केली नाहीत. भाजपने हवे तर न्यायालयात जावे. पण, प्रचाराची पातळी एवढी का घसरली याचा विचार आवश्‍यक आहे. 
- संजय राऊत, शिवसेना नेते

Web Title: Clarification on controversial audio tape by CM Devendra Fadnavis