डोंबिवलीत नगरसेविकांमधील पाण्याचा वाद विकोपाला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

काय आहे वाद? 
आशालता बाबर या नांदिवली मिनल पार्क या प्रभागाच्या नगरसेविका असून  येथील रवीकिरण सोसायटीच्या पाणीप्रश्नावरुन बाबर आणि म्हात्रे यांच्यात वाद झाला. या सोसायटीला पाणी दिल्यास आपल्या प्रभागातील पाण्यावर परिणाम होईल  या मुद्यावरून बाबर आणि म्हात्रे आमने सामने आल्या. वादावादीनंतर हा मुद्दा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आणि त्यानंतर चर्चेसाठी शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयात गेला. 

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पाण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले असून याबद्दल सेनेच्याच नगरसेविकेच्या आपल्या पक्षातील नगरसेविकेविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

डोंबिवलीतील 27 गाव परिसरतील सेनेच्या नगरसेविका आशालता बाबर आणि प्रेमा म्हात्रे यांच्यात पाण्याच्या समस्येवरून वाद निर्माण झाला होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयासमोरच हा राडा झाला. एका सोसायटीच्या पाण्याच्या जोडणीवरून या दोघींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर झालेल्या झटापटीत प्रेमा यांनी आशालता यांच्या कानशिलात लगावली असा आरोप करण्यात आला आहे. मात्र आपण मारहाण केली नसल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे वाद? 
आशालता बाबर या नांदिवली मिनल पार्क या प्रभागाच्या नगरसेविका असून  येथील रवीकिरण सोसायटीच्या पाणीप्रश्नावरुन बाबर आणि म्हात्रे यांच्यात वाद झाला. या सोसायटीला पाणी दिल्यास आपल्या प्रभागातील पाण्यावर परिणाम होईल  या मुद्यावरून बाबर आणि म्हात्रे आमने सामने आल्या. वादावादीनंतर हा मुद्दा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आणि त्यानंतर चर्चेसाठी शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयात गेला. 

कल्याण डोंबिवलीत शिवसेना नगरसेविकांमधील वाद हे काही नवीन नाही. महापौर निवडणुकीच्या वेळीही आगरी समाजाला डावलले गेल्याचे सांगत सेनेच्या माजी नगरसेविका वैजयंती घोलप व अन्य नगरसेविकांमध्येच वाद चांगलाच रंगला होता. कल्याण पूर्वेतील माधुरी काळे आणि शीतल मांढरी यांच्यामध्येही  विकासकामांच्या श्रेयवादावरून जोरदार राडा झाला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clash between two women corporaters in Dombiwali