कचरा उचलता उचलता फुलले काव्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मुंबई -
तुम्ही दारू पिता हो देशी
अन्‌ भांडण करता माझ्याशी
दारू ही सोडा, नीट संसार करा 
असं नाही का बोलायचं...
अशा शब्दांत नवऱ्याच्या दावणीला बांधलेल्या बायकोच्या व्यथा मांडल्या आहेत मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या हरिश्‍चंद्र धीवर यांनी. त्यांचा पहिला कवितासंग्रह लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

मुंबई -
तुम्ही दारू पिता हो देशी
अन्‌ भांडण करता माझ्याशी
दारू ही सोडा, नीट संसार करा 
असं नाही का बोलायचं...
अशा शब्दांत नवऱ्याच्या दावणीला बांधलेल्या बायकोच्या व्यथा मांडल्या आहेत मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या हरिश्‍चंद्र धीवर यांनी. त्यांचा पहिला कवितासंग्रह लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

पुरंदर तालुक्‍यातील हरगुडे गावात गबीर कुटुंबात जन्मलेल्या धीवर यांचे शिक्षण दहावी नापास एवढेच. पोटाची खळगी भरण्यासाठी ते मुंबईत आले. शिक्षण नसल्याने मिळेल ते काम करून पोट भरावे लागत होते. काही दिवसांनी त्यांना मुंबई पालिकेच्या एका कंत्राटदाराकडे कचरा उचलण्याचे काम मिळाले. एक गाडी भरली की ३० रुपये मिळायचे. आता त्यांना पालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे.

शिक्षण कमी असले, तरी धीवर यांना कवितांची आवड होती. काही वर्षांपूर्वी नारायण सुर्वे यांच्या कविता त्यांच्या वाचण्यात-ऐकण्यात आल्या. त्यांच्या ‘छक्कड’ या कवितेतून प्रेरणा घेत धीवर यांनीही कविता करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कामगारांच्या आंदोलनांवर आधारित कविता लिहिल्या. नाडल्या गेलेल्या कामगारांमध्ये लढण्याची उमेद वाढवण्याचे काम त्यांची कविता करते. ते लिहितात...

नाही फक्त पैशासाठी
मी लढतोय समान हक्कासाठी
कोण रे तो ठेकेदार
कुठला रे तो मालक 
पिळवणूक करून आपली
तो करतोय लाचार
रोकूया त्यास आज 
पेटून तुम्ही उठा रे...

स्त्री ही समाजातील सर्वांत शोषित घटक असल्याचे जाणवल्याने धीवर यांनी कवितांतून स्त्रियांच्या व्यथाही मांडल्या आहेत. अलिकडेच टाटा समाज विज्ञान संस्थेच्या वार्षिक प्रकाशनातही धीवर यांची कविता प्रसिद्ध झाली आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या कवितांचे कार्यक्रमही झाले आहेत.

१५ वर्षांपूर्वी काव्य वाचनाच्या कार्यक्रमात नारायण सुर्वे यांनी माझी पाठ थोपटली. त्यातून आणखी चांगल्या कविता करण्याची प्रेरणा मिळाली. पहिला काव्यसंग्रह माझ्या नव्या जीवनाची सुरुवात आहे.
- हरिश्‍चंद्र धीवर, मुंबई पालिकेतील सफाई कामगार

Web Title: clean sweeper of municipal corporation Harishchandra Dhivar