सफाई कामगारांसाठी उद्धव ठाकरे आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 जून 2018

मुंबई - मुंबई महानगरपालिकेत मागील 12 वर्षांपासून काम करणाऱ्या 2700 कंत्राटी सफाई कामगारांना मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असतानाही प्रशासन अंमलबजावणी करत नाही, असा संताप व्यक्‍त करत, या सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या पद्धतीने साम-दाम-दंडाचा वापर करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिला.

शिवसेना भवन मध्ये आयोजित सर्व नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे, राज्य सरकारच्या इशाऱ्याने महापालिकेत शिवसेनेची कोंडी करणाऱ्या प्रशासनाला आव्हान देत ठाकरे यांनी भाजप विरोधात आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 7 एप्रिल, 2017 रोजी 2700 कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत आदेश दिला आहे. 2700 पैकी 1600 कामगारांचे महानगरपालिका अधिकारी, युनियन प्रतिनिधी आणि सरकारी कामगार अधिकारी यांचे समक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत असल्याबाबत व्यक्तिशः पडताळणी झालेली आहे. उरलेल्या 1100 कामगारांची पडताळणी करून त्यांनाही कायम नोकरी देण्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. पण एक वर्ष होत आले तरीही पालिका प्रशासन पडताळणी पूर्ण करत नाही.

यामध्ये पालिका प्रशासनाकडून कामगारांच्या पूर्वी दिलेल्या नावात व आताच्या आधारकार्ड वर असलेल्या नावात किरकोळ "इंग्रजी स्पेलिंग मिस्टेक' असल्याने कामगारांना कायम करण्यात येत नाही. व सध्या त्यांना कामावरून कमी केले जात असल्याचा खेद व्यक्‍त करत, या कामगारांच्या हक्‍कासाठी शिवसेना आक्रमक होणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: cleaning worker uddhav thackeray