नवी मुंबईत स्वच्छतेचे तीनतेरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

स्वच्छता अभियान मोहिमेत कचरा व्यवस्थापनाचा बहुमान मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले असल्यामुळे स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

तुर्भे - स्वच्छता अभियान मोहिमेत कचरा व्यवस्थापनाचा बहुमान मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले असल्यामुळे स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

स्वच्छ भारत अभियान हे अविरत चालणे अपेक्षित आहे; परंतु घनकचरा व्यवस्थापन विभाग फक्त प्रत्येक वर्षीच्या डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांच्या कालावधीतच स्वच्छता अभियान राबवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या चार महिन्यांत केंद्राची सर्वेक्षण करणारी टीम येऊन गेली की पुन्हा ‘जैसे थे’ अशी अवस्था नवी मुंबईत दिसून येत आहे. चार महिने पहाटे ६ वाजल्यापासून स्वच्छता अधिकारी आपल्या विभागात तळ ठोकून असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे घाण करणाऱ्या घटकांच्या मनात भीती होती; परंतु आता कुणाचा अंकुश नसल्याने काही नागरिक कुठेही कचरा टाकू लागले आहेत.

स्वच्छ भारत अभियानात तीन वर्षांत विविध प्रकारांतील पारितोषिके पालिकेने पटकावली आहेत. त्यामध्ये मागील वर्षी कचरा वर्गीकरणातसुद्धा पहिला क्रमांक मिळवला होता; मात्र सध्या पालिका क्षेत्रात सर्व प्रकारचा कचरा इतस्ततः पसरला आहे.

गावठाण व झोपडपट्टी भागात कचरा वर्गीकरचा फज्जा उडाला आहे. रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग जमा झाल्याचे दिसून येत आहेत. तसेच कचराकुंड्या भरून कचरा इतस्ततः पसरलेला दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे यात ओला व सुका कचरा दिसून येत आहे.

ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ व बेलापूर आदी विभागातील नोडल परिसरातसुद्धा कचरा वर्गीकरणासाठी पालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाकडून अनेक प्रयत्न केले गेले. कचरा वर्गीकरण करण्यास सहकार्य न करणाऱ्या गृहसंस्थांवर दंडात्मक कारवाई करूनही पालिकेला अपयश आले आहे.

स्वच्छता अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट
याबाबत महापालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांना विचारले असता, आपणास कोणतीही माहिती देण्याचे अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cleanliness in Navi Mumbai