आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून पवई तलावाची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

अभ्युदय आयआयटी बॉम्बे आणि पालिकेने एकत्रित सफाई मोहीम राबवत पवई तलाव आणि परिसराची स्वच्छता केली. तब्बल 330 स्वयंसेवक माेहिमेत सहभागी झाले होते

मुंबई : वाढत्या प्रदूषणामुळे पवई तलावामधील पाणीही दिवसेंदिवस दूषित होत चालले आहे. पावसाच्या पाण्याद्वारे सांडपाणी, घनकचरा विशेषत: प्लास्टिक मोठ्या संख्येने तलावात वाहून येत आहे. तलावाचे सतत वाढत जाणारे प्रदूषण रोखण्यासाठी अभ्युदय आयआयटी बॉम्बे आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने व "सकाळ'च्या सहाकार्याने पवई तलावाच्या तीन किलोमीटर परिसराची रविवारी (ता. 3) स्वच्छता करण्यात आली. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सुरू असलेल्या मोहिमेत 1.5 टन कचरा जमा करण्यात आला. 

शनिवारी छटपूजेनिमित्त उत्तर भारतीय समाज पवई तलावाजवळ मोठ्या संख्येने एकवटला होता. त्यामुळे रविवारी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा जमा झाला होता. साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी व रोगराई पसरू नये म्हणून विशेष मोहीम राबवण्यात आली. मुंबईतील विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर पालिकेला परिसराची स्वच्छता करावी लागते. अशा वेळी पालिकेला मदतीचा हात म्हणून "सकाळ' व "अभ्युदय आयआयटी बॉम्बे'ने मोहिमेत सहभाग घेतला. 

गेल्या 5 जून रोजी अभ्युदय आयआयटी बॉम्बेतर्फे पवई तलाव आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. 400 हून अधिक स्वयंसेवकांनी त्या वेळी 1.5 टन कचरा जमा केला होता. मोहिमेचा पुढचा भाग म्हणून संस्थेने पालिकेच्या सहकार्याने रविवारी पवई तलावाची स्वच्छता व जागृतीची दुसरी मोहीम हाती घेतली. स्वच्छ, हरित आणि निरोगी वातावरणाला चालना देण्यासाठी पवई तलावाच्या काठाचा परिसर स्वच्छ करणे मोहिमेचे उद्दिष्ट होते. पवई गार्डन ते तलाव असा तीन किलोमीटर परिसराची स्वच्छता करण्यात आली. मोहिमेत तब्बल 300 स्वयंसेवक सहभागी झाले होते. 

1.5 टन कचरा जमा 
मोहिमेत 300 हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. तलावाच्या तीन किमी परिसरातील सुमारे 1.5 टन कचरा स्वयंसेवकांनी जमा केला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कचऱ्यामुळे तलाव प्रदूषित होऊ नये, यासाठी घनकचरा तलावात सोडण्यापूर्वी त्यावर काय प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे, याबाबत माहिती दिली. तलावाला सुशोभित करणाऱ्या योजना अंमलात आणण्याचा संकल्प करण्यात आला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanup campaign at Powai Lake by IIT students in mumbai