बोरिवलीत क्‍लीनअप मार्शल्सची मुजोरी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

मागठाणे - मुंबई स्वच्छता राहण्यासाठी महापालिकेतर्फे ठिकठिकाणी "क्‍लीनअप मार्शल्स'ची पथके नेमण्यात आली आहेत. शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर ही पथके कारवाई करून दंड वसूल करतात; मात्र क्‍लीनअप मार्शल मुजोरी करत असल्याचा आरोप बोरिवलीतील नागरिक करत आहेत.

मागठाणे - मुंबई स्वच्छता राहण्यासाठी महापालिकेतर्फे ठिकठिकाणी "क्‍लीनअप मार्शल्स'ची पथके नेमण्यात आली आहेत. शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर ही पथके कारवाई करून दंड वसूल करतात; मात्र क्‍लीनअप मार्शल मुजोरी करत असल्याचा आरोप बोरिवलीतील नागरिक करत आहेत.

बोरिवली स्थानकाच्या पूर्वेला उभे असलेले क्‍लीनअप मार्शल्स रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि कचरा टाकणाऱ्या व्यक्तींकडून जबरदस्तीने दंड वसूल करतात; मात्र पदपथावरील अस्वच्छता पसरवणाऱ्या फेरीवाल्यांवर काहीच कारवाई करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर अस्वच्छता असणाऱ्या ठिकाणी एका व्यक्तीने पाणी टाकून घाण बाजूला केली. तेव्हा मार्शल्स त्यांच्याकडून जबरदस्तीने दंड वसूल करू लागले. आपण रस्त्यावरील घाण बाजूला केल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. तरीही मुजोरी करत मार्शल्सनी त्यांच्याकडून जबरदस्तीने दंड वसूल केला. या घटनेबाबत मार्शल्सचे निरीक्षक शरद मोरे यांना विचारले असता, त्यांनी उद्धट भाषेत उडवाउडवीचे उत्तर दिले. अस्वच्छता पसरवणाऱ्या फेरीवाल्यांकडून आम्ही महिन्याचा दंड वसूल करतो, असे त्यांनी सांगितले. तसेच तुम्हाला काय करायचे आहे ते करा, असे धमकावण्यात आले. याबाबत पालिकेच्या एल वॉर्डाचे निरीक्षक अजिंक्‍य कांबळे यांनी सांगितले की, फेरीवाल्यांकडून दंड आकारण्यात येतो. शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. तसेच मार्शलच्या मुजोरीबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Cleanup Marshal Insubordination in Boriwali?