'टीसीएस'च्या संचालकपदावरून सायरस मिस्त्रींना काढण्यास मंजुरी

पीटीआय
बुधवार, 14 डिसेंबर 2016

मुंबई - टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुसंख्य भागधारकांनी सायरस मिस्त्री यांच्या "टीसीएस'च्या संचालकपदावरील हकालपट्टीस मंजुरी दिली. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यावरील विश्‍वास कायम ठेवत भागधारकांनी मिस्त्रींना नाकारले. विशेष म्हणजे या बैठकीला मिस्त्री अनुपस्थित होते.

मुंबई - टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुसंख्य भागधारकांनी सायरस मिस्त्री यांच्या "टीसीएस'च्या संचालकपदावरील हकालपट्टीस मंजुरी दिली. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यावरील विश्‍वास कायम ठेवत भागधारकांनी मिस्त्रींना नाकारले. विशेष म्हणजे या बैठकीला मिस्त्री अनुपस्थित होते.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संध्याकाळी भागधारकांची सभा झाली. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्यासह टीसीएसचे हंगामी अध्यक्ष ईशात हुसेन, संचालक मंडळावरील बहुतांश संचालक सभेला उपस्थित होते. गेल्या सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या टाटा-मिस्त्रींमधील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीला "टीसीएस'चे किरकोळ भागधारक आणि संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय होती. रतन टाटा यांच्या उपस्थितीने सभेत चैतन्य निर्माण झाले. मतदानापूर्वी "टीसीएस' संचालक आणि भागधारकांमध्ये चर्चा झाली. या वेळी भागधारकांनी जाहीर मते मांडली.

भविष्यात मिस्त्रींकडून होणारी कायदेशीर लढाई लक्षात घेता या सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. मतदान प्रक्रियेत उपस्थितांपैकी जवळपास 80 टक्के भागधारकांनी रतन टाटांवर विश्‍वास दाखवल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. तत्पूर्वी मिस्त्री यांनी लिहिलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. या निर्णयानंतर टाटा समूह आणि मिस्त्री यांच्यातील वाद निर्णायक टप्प्यात आल्याचे बोलले जात आहे. यापुढे टाटा टेलिसर्व्हिसेस, इंडियन हॉटेल, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर या कंपन्यांच्या सर्वसाधारण सभा होणार असून, आजचा निर्णय भागधारकांवर परिणाम करू शकतो, असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मतदान ही केवळ औपचारिकता - मिस्त्री
सभेपूर्वी मिस्त्री यांनी भागधारकांना पत्र लिहून भावनिक आवाहन केले होते. या पत्रात टाटा समूहाचा सारासार विचार करून भागधारकांनी सद्‌सद्विवेकबुद्धीने मतदान करावे. टाटा समूहाच्या संस्थापकांची मूल्ये आणि वारसा जपण्यासाठी सुशासनाच्या बाजूने कौल द्यावा, असे आवाहन मिस्त्री यांनी केले होते. मात्र, भागधारकांचा विश्‍वास मिळवण्यात मिस्त्रींना अपयश आले. दरम्यान, टीसीएसमध्ये टाटा सन्सची तब्बल 73.33 टक्‍के हिस्सेदारी असल्याने निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे स्पष्ट करत विशेष सर्वसाधारण सभेतील मतदान ही केवळ औपचारिकता असल्याचे मिस्त्री यांनी म्हटले आहे.

Web Title: Clearance to remove the TCS's director sairas mistry