पायउतार केलेल्या लिपीकांच्याच सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त्या

दिनेश गोगी
गुरुवार, 21 जून 2018

काल रिक्त झालेल्या या दोन्ही पदांवर यापूर्वी अनधिकृत बांधकामांचा ठपका ठेऊन पायउतार करण्यात आलेल्या भगवान कुमावत आणि अजित गोवारी यांची वर्णी लावण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांना देखील अनेकदा पायउतार करण्यात आलेले आहे.

उल्हासनगर - विविध कारणांनी कधी निलंबित तर कधी पाणउतारा करून पायउतार केल्या जाणाऱ्या लिपीकांच्याच प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त्या करण्याचा नित्याचा फंडा उल्हासनगर महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकारी वर्षोनुवर्षा पासून राबवत आहेत. त्यामुळे या पदासाठी लायक असणाऱ्या तरुण लिपिकांचे स्वप्न अधांतरी राहत असून या तरुणांना एखादी संधी मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दिड वर्षांपूर्वी राज्यशासनाकडून उल्हासनगरात प्रतिनियुक्तीवर आलेले सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे व बालाजी लोंढे यांच्या अनुक्रमे पालघर जिल्ह्यातील वाडा आणि रत्नागिरी जिल्ह्या मधील देवरुख नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्त्या झाल्या आहेत. त्यांनी त्यांचा पदभार आठवड्यापूर्वी स्विकारला आहे. आठवड्यापासून या रिक्त पदांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली होती. काल रिक्त झालेल्या या दोन्ही पदांवर यापूर्वी अनधिकृत बांधकामांचा ठपका ठेऊन पायउतार करण्यात आलेल्या भगवान कुमावत आणि अजित गोवारी यांची वर्णी लावण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांना देखील अनेकदा पायउतार करण्यात आलेले आहे.

त्याच त्या जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आणि नव्या चेहऱ्यांना दुर्लक्षित ठेवण्याचा किंबहूना त्यांना डावलण्याचा उल्हासनगर महानगरपालिकेचा हा नित्याचा फंडा झाला आहे. या पायंड्याला मोडीत काढण्याची आणि विविध विभागात काम करण्याचा अनुभव असलेल्या नव्या होतकरू लिपिक चेहऱ्यांना प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाची संधी देण्याची मानसिक तयारी पालिकेने ठेवावी, अशी मागणी पालिका कर्मचाऱ्यात दब्या आवाजात होऊ लागली आहे.

दरम्यान आयुक्त गणेश पाटील, उपायुक्त मुख्यालय संतोष देहरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे सहाय्यक आयुक्तांच्या प्रभाग निहाय अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यात प्रभाग 2 चे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांची प्रभाग 1, मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांची प्रभाग 2, प्रभाग 4 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांची प्रभाग 3 व प्रभाग 4 च्या सहाय्यक आयुक्त पदी अजित गोवारी यांच्या नावांचा समावेश आहे.यात गणेश शिंपी यांच्याकडे संपूर्ण उल्हासनगरातील अनधिकृत बांधकाम निष्काशन विभागाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपवण्यात आला आहे. हा विभाग पूर्वी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याकडे होता.

त्याच त्या जुन्या चेहऱ्यांनाच सहाय्यक आयुक्त पदांची संधी देण्यात येत असल्याबाबत मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते रजेवर असल्याने त्यांचे दोन्ही मोबाईल नॉट रिचेबल मिळत होते. मात्र ह्या नियुक्त्या जेष्ठता यादी नुसार झाल्या आहेत.त्याखालोखाल असणाऱ्या लिपीकांच्या मुलाखती देहरकर यांनी घेतल्या. पण कुणी सहाय्यक आयुक्त पदावर काम करण्यास तयार नसल्याने भगवान कुमावत, अजित गोवारी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आल्याचे पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: clerk selection issue at ulhasnagar