महामार्गांवरील बाटली बंदचा ठाणे व पुण्याला फटका

मंगेश सौंदाळकर
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मुंबई - रस्त्यांवरील अपघात रोखण्याकरिता राज्य महामार्गांवरील मद्यविक्री बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाचा फटका ठाणे-पुण्याला चांगलाच बसणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक मद्यविक्रीची दुकाने आहेत. या निर्णयाबाबत राज्याचे मुख्य सचिव आढावा घेऊन कार्यवाही करणार आहेत.

मुंबई - रस्त्यांवरील अपघात रोखण्याकरिता राज्य महामार्गांवरील मद्यविक्री बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाचा फटका ठाणे-पुण्याला चांगलाच बसणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक मद्यविक्रीची दुकाने आहेत. या निर्णयाबाबत राज्याचे मुख्य सचिव आढावा घेऊन कार्यवाही करणार आहेत.

देशातील रस्ते अपघातांची संख्या सतत वाढत आहे. याची दखल घेऊन नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने राज्य महामार्गावरील मद्यविक्री दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. महामार्गापासून मद्यविक्री दुकाने पाचशे मीटर दूर असावीत, असाही आदेश दिला आहे. राज्यात दोन लाख 99 हजार 368 किलोमीटरचे रस्ते आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार महामार्गांजवळ पाच हजार परमिट रूम आहेत. देशी दारूची एक हजार 100, वाइन शॉप 350 आणि बिअर शॉपी दोन हजार आहेत.

सरकारच्या निर्णयाचा मोठा परिणाम ठाणे-पालघर आणि पुण्यात जाणवणार आहे. ठाण्यात 703 आणि पुण्यात 450 परमिट रूम आहेत. नाशिक व नागपूरमध्ये प्रत्येकी 350 परमिट रूमची नोंद उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. ठाणे-पालघर महामार्गावर देशी दारूची 275 दुकाने आहेत. ठाण्यात 125, पुण्यात 75 आणि नागपूरमध्ये 33 वाइन शॉप आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जवळपास एक हजार बिअर शॉपी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य सरकारने पालन केल्यावर ठाणे आणि पुण्यात याचा सर्वाधिक परिणाम जाणवेल.

या निर्णयाबाबत उत्पादन शुल्क विभागाला अध्यादेश काढावा लागेल. त्यापूर्वी मुख्य सचिव, गृहसचिव, उत्पादन शुल्क आयुक्त यांना एकत्र बसून आढावा घ्यावा लागेल. आढावा घेऊन मद्यविक्रीची दुकाने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याविषयी निर्णय घ्यावा लागेल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सरासरी 37 मृत्यू; 108 जखमी
सरकारच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये राज्यात 42 हजार 250 अपघात झाले. त्यात 13 हजार 685 जणांचा मृत्यू झाला. 39 हजार 301 जखमी झाले. दररोज सरासरी 37 जणांचा मृत्यू आणि 108 जण जखमी होतात. विशेष म्हणजे पाच हजार 662 जणांचा दुचाकी वाहनांमुळे, तर दोन हजार 252 जणांचा ट्रक अपघातांत मृत्यू झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक अपघात औरंगाबाद आणि मुंबईत झाले आहेत. 2014 आणि 2015 चा विचार करता अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण 1.15 टक्के वाढले आहे.

Web Title: Close Thane and Pune Highway bottle