दलदलयुक्त मैदानात मुख्यमंत्र्यांची सभा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

ठाणे - बेकायदा बांधकामे... जागोजागी साचलेला कचरा... सांडपाण्याची दुर्गंधी... आणि धुळीचे लोट यातून मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने तरी सुटका होईल, अशी दिव्यातील नागरिकांची अपेक्षा फोल ठरली. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी दिवा पूर्वेतील महोत्सव मैदानामध्ये पोहचल्यानंतर प्रत्येकाची निराशाच होत होती. कचरा साफ करून तयार केलेले मैदान, त्यावर सजावट करून तयार केलेले व्यासपीठ विद्युत रोषणाईने चमकत असले तरी मैदानात पाण्याचे डबके समस्यांची चुणूक दाखवत होते.

ठाणे - बेकायदा बांधकामे... जागोजागी साचलेला कचरा... सांडपाण्याची दुर्गंधी... आणि धुळीचे लोट यातून मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने तरी सुटका होईल, अशी दिव्यातील नागरिकांची अपेक्षा फोल ठरली. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी दिवा पूर्वेतील महोत्सव मैदानामध्ये पोहचल्यानंतर प्रत्येकाची निराशाच होत होती. कचरा साफ करून तयार केलेले मैदान, त्यावर सजावट करून तयार केलेले व्यासपीठ विद्युत रोषणाईने चमकत असले तरी मैदानात पाण्याचे डबके समस्यांची चुणूक दाखवत होते. पालिकेने ठिकठिकाणी स्वच्छता करून दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांनी मुख्यमंत्र्यांनी रोज दिव्याला यावे तरच इथले जीवन सुसह्य होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

कचरा आणि सांडपाण्याच्या दुर्गंधीने नागरिक पुरते हैराण झाले. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या ठिकाणी असलेल्या या दुरवस्थेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ठाणे पालिकेत आतापर्यंत फक्त दोन नगरसेवक पोहोचले आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार यंदा ११ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या दिव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिव्याची निवड केली. दिव्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री येण्याचा ऐतिहासिक दिवस शनिवारी उगवला होता. त्यामुळे पालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात कामाला लागले. रस्ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कचरा उचलून तेथे कीटकनाशके फवारण्यात आली. हे प्रकार पाहिल्यानंतर दिव्यातील नागरिकांना आश्‍चर्याचा सुखद धक्का बसत होता. त्यामुळे हे बदल मुख्यमंत्र्यांमुळे होत असतील तर मुख्यमंत्र्यांनी रोज यावे, असे निमंत्रणच नागरिकांनी दिले.

सभास्थळी दलदल
दिव्यामध्ये पाणीटंचाई असल्यामुळे येथील महिलांना लोकलने मुंब्रा येथे जाऊन पाणी भरावे लागते. शनिवारीही पश्‍चिमेकडील भागामध्ये अनेक मंडळी लांबलचक भांड्यांची रांग लावून पाण्याची वाट पाहताना दिसत होती; मात्र त्याचवेळी सभास्थानी तलावच अवतरला होता. त्यामुळे मैदानामध्ये दलदल निर्माण झाली होती.

Web Title: CM meetings in thane