विना मास्क मंत्रालयात पोहोचलेल्या राज ठाकरेंनी सरकारला केली 'ही' विचारणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मे 2020

राज ठाकरेंनी लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा प्रश्न सरकारला विचारला

मुंबई- संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरेंनी लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा प्रश्न सरकारला विचारला आहे. 

बैठक झाल्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीत सरकारला केलेल्या सूचनांबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे या बैठकीला राज ठाकरेंसोबत मनसे नेते अमित ठाकरेही उपस्थित होते. 

एक्सिट प्लॅनचं काय? 

सध्या राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. त्याबाबत सरकारनं एक्झिट प्लॅन काय तयार केला आहे? असा प्रश्न राज ठाकरेंनी सरकारवर उपस्थित केला. कधीतरी लॉकडाऊन काढवाच लागणार आहे. कोरोनावर लस येईपर्यंत लॉकडाऊन असेल असंही नाही आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्याआधी 10 ते 15 दिवस आधी सांगणं आवश्यक असून काय होणार, कोणत्या गोष्टी सुरु होतील याची माहित नागरिकांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे सरकारनं एक्झिट प्लॅन राज्यासमोर लवकरात लवकर ठेवावा. तसंच सरकार याबाबतच उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. 

रात्री १० वाजता अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना का केला फोन ?

कंटेन्मेंट झोन पोलिसांचा ताफा वाढवा 

कंटेन्मेंट झोनमध्ये अधिक फोर्स वाढवा अशी मागणी राज ठाकरे सरकारकडे केली आहे. आता पोलिस थकले आहेत. ते सुद्धा तणावात आहेत. राज्यात काही भागात आणि कंटेन्मेंट झोनमध्ये काही गोष्टी गृहीत धरलं जातं आहेत. त्याठिकाणी 
SRPF तैनात करावा. जेणेकरुन लोक बाहेर येऊ नयेत, कोरोना पसरु नये, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

लहान दवाखान्याची गरज आहे

छोटे दवाखाने सुरु करण्याची गरज आहे. दवाखाने सुरु करताना तिथे पोलीस असणं आवश्यक असून दवाखान्याबाहेरील रांगांवर नियंत्रण ठेवावं. 

अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी

लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या शहरात अडकलेत. त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Image

मोठी बातमी - मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण

तपासणी करुनच परप्रातियांना राज्यात प्रवेश द्या 

परप्रांतिय मजूर आहेत ते पुन्हा राज्यात येताना त्यांची तपासणी करावी. ते ज्या राज्यातून येत आहेत, त्यांची परिस्थिती माहित नाहीत. त्यामुळे तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचवेळी परत येताना त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करावी. आजपर्यंत जो गोंधळ झाला होता, आता तो सुधारण्याची हीच वेळ आहे.

तरुणांनी हीच रोजगाराची संधी आहे 

आता परप्रांतिय स्वगृही गेले आहेत, त्यामुळे कामगारांअभावी महाराष्ट्रातील उद्योग बंद, आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण-तरुणींपर्यंत रोजगाराची माहिती पोहोचवावी. त्यांना रोजगार द्यावा. परप्रांतिय जे बाहेर गेले आहेत, त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळेल, संधी आहे ती घालवू नये, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शाळा कशा सुरु करणार? 

शाळा कशाप्रकारे सुरु करणार? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.  ई लर्निंग वगैरे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. ग्रामीण भागासह शहरातही अनेक ठिकाणी ई लर्निंग अनेकांना शक्य होत नाही आहे. ती बाब पालकांपर्यंत पोहोचवंणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

महापालिका कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस कर्मचारी यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असं राज ठाकरे म्हणालेत. सफाई कामगार आजारी पडत आहेत, त्यांनी हात वर केले, तर शहरांची अवस्था काय होईल? त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या, असं त्यांनी आर्वजून सांगितलं आहे.

Big News - चिंता वाढतेच आहे, 531 पोलिसांना कोरोनाची लागण...

विना मास्क मंत्रालयात पोहोचले राज ठाकरे

आजच्या बैठकीला राज ठाकरे विना मास्कचं मंत्रालयात पोहोचले. यावेळी सर्व नेत्यांनी मास्क घातला होता. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असतानाही राज ठाकरेंनी मास्क न घालताच मंत्रालयात प्रवेश केला. त्यामुळे संपूर्ण मंत्रालयात एकच चर्चा रंगू लागली. 

बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना पत्रकारांनी त्यांना मास्क न घालण्याचं कारण विचारलं. पत्रकारांनी राज ठाकरेंना विचारलं की, तुम्ही मास्क का नाही घातला? तेव्हा राज ठाकरे हसले आणि म्हणाले की, सगळ्यांनी मास्क घातलाय म्हणून मी मास्क घातला नाही.    असं हसत हसत राज ठाकरेंनी पत्रकारांना उत्तर दिलं.

बैठकीला 18 पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण

राज्यातल्या वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीला  विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, रासपचे नेते महादेव जानकर, शेकापचे नेते जयंत पाटील, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई इत्यादी नेते हजर होते. तर महाविकासआघाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी 18 पक्षांच्या नेत्यांना बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. तसंच यावेळी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंनीही बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM uddhav thackeray called all party meet raj thackeray asked these questions