esakal | मराठा आरक्षण: "उद्धव ठाकरेंना आज मनापासून आनंद झाला असेल"

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray
  • "मुख्यमंत्र्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे"

  • "शिवेसनेला कधीच मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नव्हतं"

  • "मराठा समाजाचा मुख्यमंत्री असता, तर निकाल वेगळा असता"

मराठा आरक्षण: "उद्धव ठाकरेंना आज मनापासून आनंद झाला असेल"
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: "आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या विकासाला खीळ लावणारा आहे. राज्य सरकार या प्रश्नात कमी पडले. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळालं नाही त्याचं कारण हे तीन पक्षाचं सरकार आणि मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. मी शिवसेनेत ३९ वर्षे होते. मला माहिती आहे की शिवसेनेला (Shivsena) आणि शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी भूमिका उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घेत आहेत. त्यांना आज मनापासून आनंद झाला असेल", असा खळबळजनक आरोप नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. (CM Uddhav Thackeray is a Happy man as Maratha Reservation cancelled says BJP Narayan Rane)

हेही वाचा: … तरीही अनपेक्षित निकाल हाती आला- गृहमंत्री वळसे पाटील

"मराठा समाज हा संघटित आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाला काहीही करू शकत नव्हते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं केवळ ते दाखवत होते. सुप्रीम कोर्टात ही याचिका गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारने नक्की काय अभ्यास केला? कोणते प्रयत्न केले? अशोक चव्हाणांची (Ashok Chavan) समिती तयार केली. त्यात कोणाला बोलवलं? किती तज्ज्ञ होते? किती समित्यांशी चर्चा केली. आधी ज्या समित्यांनी यावर काम केलंय त्यांना किती वेळा बोलावलं? यातलं काहीही केलं नाही", असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: Maratha Reservation: डबेवाला संघटनेची भावनिक प्रतिक्रिया

"मुख्यमंत्र्यांना कायद्यामधलं काय कळतं? आरक्षणाबद्दलच्या गोष्टींमध्ये कशाशी काय खातात, हे तरी उद्धव ठाकरे यांना माहिती आहे का? मराठा समाजाच्या विरोधात वातावरण गेल्यानतंर सध्या राज्यात तप्त असं वातावरण आहे. आपल्यावर अन्याय झाला या भूमिकेतून सर्वच लोक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जो निर्णय घेतला त्याबद्दल मी काहीही म्हणणार नाही. पण मराठा समाजासाठी मात्र हा निर्णय दुर्दैवी आहे. हे खेदजनक आहे. आम्हाला दु:ख पोहोचवणारं आणि समाजापासून वंचित ठेवणारं आहे", असंही राणे म्हणाले.

हेही वाचा: "हा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा"

"ज्या समाजाने आतापर्यंत इतर समाजांना आरक्षण मिळवून देण्यात महत्त्वाचं काम केलं. त्यांनाच आज आरक्षण नाकारण्यात येतंय. जर आज राज्यात मराठा समाजाचा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता. मराठा समाजाच्या अपेक्षांचा अनादर झाला. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता संपला असेल, पण मराठा समाज अजूनही महाराष्ट्रात जिवंत आहे", असं राणे यांनी ठणकावून सांगितलं.