स्वच्छता अभियानात आता मुख्यमंत्रीही सहभागी होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

गेल्या 1 ते 23 जुलै या कालावधी  सुमारे 5 हजार 400 व्‍यक्‍तींवर कारवाई करुन 9 लाख 88 हजार 700 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबई : नाल्‍यांमध्‍ये कचरा टाकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरु असून अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींकडून या जुलै महिन्यात 50 लाख रुपयांची दंड वसुली महापालिकेने केली आहे. स्वच्छता अभियान आता व्यापक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोहिमेत सहभागी होणार आहेत. 

गेल्या 1 ते 23 जुलै या कालावधी  सुमारे 5 हजार 400 व्‍यक्‍तींवर कारवाई करुन 9 लाख 88 हजार 700 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जास्‍त वर्दळीच्या ठिकाणी परिसर अस्‍वच्‍छ करणाऱ्या व्‍यक्‍तींवरही उपद्रव शोध पथकांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत 14 हजार 376 व्यक्तींवर कारवाई करुन 39 लाख 77 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्‍यात आला आहे. दंडापोटी एकूण 50 लाख रूपयांचा महसूल महापालिकेला मिळाला आहे. 

आतापर्यंत अस्वच्छता करणाऱ्या 19 हजार 752 व्यक्तींवर कारवाई करुन 50 लाख 79 हजार 100 रुपये रक्कम दंड स्वरुपात जमा केली आहे, अशी माहिती महापालिकेचे सह आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) अशोक खैरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक स्वच्छता रहावी यासाठी नागरिकांमध्ये अधिक प्रभावी जाणीव जागृती व्हावी, यासाठी दर महिन्यातील सर्व शनिवार-रविवार सहित किमान 10 दिवस लोकसहभागातून आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेमार्फत संयुक्त 'कचरामुक्त मुंबई अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. 29) सकाळी 11:30 वाजता मुंबई पोलिस मुख्यालयात होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM will now participate in the cleanliness campaign