पनवेलमध्ये सीएनजी वाहनांची चलती

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

इंधन दरवाढीचा फटका; वाहन खरेदीवर मंदीचे सावट 

पनवेल : एकीकडे ऑटोमोबाईल क्षेत्रावर मंदीचा परिणाम जाणवत असल्याने सर्व प्रकारातील वाहनखरेदीला ग्राहक नापसंती दाखवत असल्याचे चित्र असताना खासगी वापराकरिता सीएनजीवर चालणाऱ्या वाहनखरेदीला मात्र ग्राहकांकडून काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ च्या वाहनखरेदीच्या आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे. 

पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार पनवेल परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात मागील वर्षी ऑगस्ट २०१७ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत २९०२ खासगी वापरातील वाहनांची नोंद करण्यात आली होती; तर २०१८-१९ मध्ये २९७१ सीएनजीवर चालणारी चारचाकी वाहने रस्त्यावर उतरवण्यात आली होती. आर्थिक मंदी, वाढते पेट्रोल-डिझेलचे भाव याच्या परिणामामुळे वाहन क्षेत्रातील उद्योगांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अनेक कंपन्यांनी कामगारकपातीचा निर्णयदेखील यापूर्वी घेतला आहे.

पनवेल, उरण परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विकासकामांमुळे तालुक्‍यात बऱ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता आहे. याचा परिणाम म्हणून घरात एखादी तरी चारचाकी असणे हा स्टेटस सिम्बॉल झाला असल्याने चारचाकी वाहन खरेदीवर परिणाम झाला असला, तरी पनवेल, उरण परिसरात चारचाकी वाहनांना बऱ्यापैकी बाजारपेठ असल्याचे पनवेल उरण परिसरातील नागरिकांनी वर्षभरात खरेदी केलेल्या वाहनांच्या आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे. मागील वर्षी ११ हजार ७४२ हलक्‍या वजनाची चारचाकी वाहनखरेदी करण्यात आली होती; तर या वर्षी आतापर्यंत ११ हजार १५६ वाहनांची विक्री करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CNG Vehicles demand in Panvel