`क्‍यार'चा किनारपट्टीला फटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

रायगडात 40 मासेमारी नौकांचे नुकसान

अलिबाग : रायगडसह कोकण किनारपट्टीवर शनिवारी सकाळपासून "क्‍यार' चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. लाटांच्या माराने बंदरात नांगरून ठेवलेल्या 30 ते 40 मासेमारी नौकांचे रायगडात नुकसान झाले. चक्रीवादळामुळे मुंबई-मांडवा जलवाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. मच्छीमारांमध्ये "क्‍यार'ची धडकी आहे. दरम्यान, या वादळात एकही मासेमारी नौका भरकटली नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. 

रायगडमधील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच मासेमारी नौका बंदरात दाखल झाल्या, अशी माहिती मत्स्यव्यवसाय अधिकारी अभयसिंह शिंदे यांनी दिली. शनिवारी सकाळपासूच मांडवा, वरसोली, बोर्ली, दिघी बंदरात वादळाचा प्रभाव दिसून आला. दिघी आणि वरसोली बंदरात चक्रीवादळामुळे नौका एकमेकांवर आदळून नुकसान झाले. इशारा मिळताच नौका बंदरात आणण्यात आल्या होत्या; मात्र त्या भरतीरेषेतच राहिल्याने लाटांच्या तडाख्यात त्यांचे नुकसान झाल्याचे थळ मच्छीमार संघटनेचे शेषनाथ कोळी यांनी सांगितले. हे वादळ पश्‍चिमेकडे सरकत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याचा आहे. त्यामुळे सायंकाळपासून वादळाचा जोर कमी होऊ लागला. समुद्रातील वादळसदृश स्थितीमुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मुंबई-मांडवा, रेवस आणि मोरा बंदरातील सागरी जलवाहतूक शनिवारी सकाळपासूनच बंद आहे. बंदरात "तीन नंबर'चा (अतिधोका) बावटा लावण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या सूचनेनुसार वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे रेवस बंदर अधिकारी ए. एन. मानकर यांनी सांगितले. दिवाळीनिमित्त मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांना या वादळाचा फटका बसला. पावसामुळे महामार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरू होती. पावसामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला. शुक्रवारी हे चक्रीवादळ पश्‍चिम किनारपट्टीपासून 190 कि.मी. दूर होते; तर मुंबईपासून सध्या ते 340 कि.मी.वर आहे. हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीपासून दूर जात असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सागर पाठक यांनी सांगितले. 

..... 
चौकट 

कोकण, मराठवाड्याला 
पावसाने झोडपले 
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी दिवसभर किनारपट्टी भागात अतिवृष्टी झाली. सिंधुदुर्गमधील मालवण, वेंगुर्ला आणि देवगड या तिन्ही तालुक्‍यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार सरी पडल्या. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही हलक्‍या सरींनी हजेरी लावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coastal area affected by cyclonic storm