नारळाच्या दरात शेकडा २०० रुपये वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

मागणीइतका पुरवठा होत नसल्याने नारळाच्या दरात वाढ झाली आहे. आवकेत मोठी घट झाल्याने शेकड्यामागे नारळाच्या दरात शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

नवी मुंबई : आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामात नारळाचा दर्जा खालावला आहे. त्यातच उत्पादनात घट झाल्याने नारळाची आवकही कमी झाली आहे. परिणामी, मागणीइतका पुरवठा होत नसल्याने भावात वाढ झाली आहे. आवकेत मोठी घट झाल्याने शेकड्यामागे नारळाच्या दरात शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

नारळाचा नवीन हंगाम सुरू होण्यास अद्यापही तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र, एपीएमसी मार्केटमध्ये सध्या दाखल होत असलेल्या नारळाचा आकार लहान व असमाधानकारक आहे. मात्र, तरीही मागणीइतका पुरवठा होत नसल्याने भावात वाढ झाली आहे. दिवाळीनंतर नारळाला मागणीत अल्पशी घट झाली आहे. आंध्र प्रदेशातील काही भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने त्या ठिकाणाहून होणारी आवक घटली आहे. तसेच तमिळनाडूतून येणाऱ्या नारळाची प्रत मोठ्या प्रमाणात खालावली आहे. याशिवाय कर्नाटकातूनही आवक लक्षणीय घटली आहे. मात्र, तरीही भाव चढेच असल्याची माहिती व्यापारी प्रवीण शहा यांनी दिली. डिसेंबरमध्ये दत्त जयंती, नाताळाचा सण असल्याने मागणी चांगली राहील. तसेच नवीन नारळाची आवक महाशिवरात्री दरम्यान म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. त्यानंतर नारळाचा दर्जाही सुधारणार असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coconut prices rise by Rs 200