नारळ, तांदळाचे दर वाढले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

नारळी पौर्णिमेमुळे मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने दर चढेच राहण्याची शक्‍यता 

नवी मुंबई : श्रावण महिन्यातली पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा म्हटलं की खवय्यांच्या जिभेवर नारळी भाताची चव तरळते. पण यंदा नारळी भाताचा बेत सर्वसामान्यांसाठी महाग ठरणार आहे. घाऊक बाजारात नारळाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली असतानाच तांदळाच्या किमतीतही किलोमागे तीन ते चार रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. 

वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील बिगर बासमती तांदळाची आवक घटल्याने गेल्या काही दिवसांत तांदळाच्या दरात किलोमागे वाढ झाली आहे. तांदळाची आवक कमी होण्यामागे पावसाच्या विश्रांतीचे कारण एपीएमसीतील घाऊक व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. पुढेही तांदळाची आवक वाढण्याची चिन्हे नसल्याने तांदळाचे दर चढेच राहण्याची शक्‍यता आहे; तर श्रावण म्हटला की सणासुदीचा, उपासतापासाचा महिना. त्यामुळे या काळात अधिक मागणी असल्याने नारळाचा भावही वधारला आहे. छोटा नारळ शेकड्यामागे 750 रुपयांना, तर मोठा नारळ 2800 रुपयांना घाऊक बाजारात येत आहे.

जास्त मागणी असलेला मध्यम आकाराच्या नारळाचा दर घाऊक बाजारात साडे बारा रुपये असल्याची माहिती, एपीएमसी कार्यालयातून देण्यात आली. 

नारळाचे दर नगामागे दोन ते तीन रुपयांनी वाढले असून, किरकोळ बाजारात 25 रुपयांवरून 28 ते 30 रुपयांपर्यंत नारळ मिळत आहे. पुढे गणेशोत्सव, नवरात्रीदरम्यानही नारळाचे दर चढे राहण्याची शक्‍यता आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coconuts, rice pricehike