Coffee with Sakal | लसीकरणाबाबत अधिक जनजागृतीची गरज - डॉ. नानासाहेब थोरात

Coffee with Sakal | लसीकरणाबाबत अधिक जनजागृतीची गरज - डॉ. नानासाहेब थोरात

साधारणतः गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाविरुद्ध लढत आला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता लसही उपलब्ध झाल्या आहेत. या लशी कशा तयार झाल्या, त्यांच्या चाचण्या, आपत्कालीन परिस्थितीत देण्यात आलेली मान्यता, त्याचे निकष काय असतात, याबाबत ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांच्याशी "कॉफी विथ सकाळ' कार्यक्रमात साधलेला संवाद... 
----------- 
सध्या जगभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेकडे शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही कसे बघता? 
- खरं तर लसीकरणाला ऐतिहासिक परंपरा आहे. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धावेळीही मोठ्या प्रमाणात लसीकरण केले गेले. तसेच काही विशिष्ट देशांचा दौरा करण्यापूर्वी किंवा नंतर लसीकरण बंधनकारक केले जात होते. सध्या कमीअधिक प्रमाणात काही देशांसाठी तेही केले जाते. पुढे देवी, कॉलरा, प्लेग, रोटा व्हायरस आदी आजारांमुळे लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. त्याशिवाय लहान मुलांना 10 वेगवेगळ्या प्रकारच्या लशी दिल्या जातात, ते सर्वत्र केले जातेच; मात्र अशा पद्धतीने भारतात सार्वत्रिक पातळीवर पहिल्यांदाच लसीकरण केले जात आहे. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत शंका निर्माण झाल्या. एकीकडे आपल्याकडे लहान मुलांच्या लसीकरणाचा आग्रह धरला जातो, त्याच वेळी सर्वसामान्यांकडून विशेषतः काही डॉक्‍टरांकडून लशीबाबत मात्र शंका घेतली जाते. त्यामागचे मूळ कारण म्हणजे लशींबाबत पुरेशी माहिती समोर न येणे आहे. पूर्वी लशींची निर्मिती आणि चाचणी खासगी संस्था किंवा प्रयोगशाळांमार्फत केली जायची. त्यानंतर औषध नियंत्रण मंडळाच्या मान्यतेनंतर ती बाजारात आणली जात होती. सध्या पाश्‍चात्य देशांत बहुतांश कोरोना लशींची निर्मिती खासगी संस्थांमार्फत करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व संस्थांनी या लशींबाबतचे सर्व अहवाल आणि माहिती खुल्या मंचावर उपलब्ध केले आहेत. भारतात मात्र दुर्दैवाने लशींबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. म्हणजे लस कशाप्रकारे तयार होत आहे, त्याबाबत कोणती नियमावली पाळली जात आहे, लशींबाबत सरकारची नियमावली काय आहे, आपत्कालीन परिस्थितीत मान्यता देताना कोणते नियम पाळले गेले का, याबाबतची माहिती समाजासमोर आली असती तर देशात नक्कीच लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला असता. त्यामुळे लशीबाबतचे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. लस कुठून आली आणि कोणत्या देशात तयार झाली हे महत्त्वाचे नाही. किमान आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, याच भावनेतून सर्वांनी लस घ्यायला पाहिजे. भारतात सध्या केवळ दोनच लशींना मान्यता देण्यात आली आहे; मात्र देशातील सर्व नागरिकांना लस द्यायची झाल्यास किमान 10 ते 12 कंपन्यांच्या लशी बाजारात येणे आवश्‍यक आहे. तेव्हाच आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण करू शकणार. त्यातही टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याऐवजी एका वेळी अधिकाधिक लोकांना लस द्यायला पाहिजे. कारण कोरोना हा संसर्गजन्य आणि सर्वत्र आढळणारा आजार असल्याने एकाच वेळी अधिकाधिक लोकांना लस दिल्यास सार्वजनिक पातळीवर प्रतिकारशक्ती तयार व्हायला मदत होईल. म्हणजे एखाद्या खेडेगावात एकाच दिवशी सर्वांनाच लस दिली जावी, म्हणजे त्याचा अधिक फायदा होईल. 
---- 
कोरोनाचा इतर आजारांवर काय परिणाम झाला? 
- मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, मानसिक तणाव आदी आजारांच्या रुग्णांना कोरोना काळात बराच त्रास झाला. कारण या आजारांमुळे मुळात प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि त्यातच कोरोना झाल्यास रुग्णाला मूळ आजारासह कोरोनालाही तोंड द्यावे लागले. त्यामुळे या आजारांच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कोरोनात अधिक होते. त्यावर उपाय म्हणून अँटीबॉडीज वापर झाला; मात्र त्याचाही अतिवापर घातक आहे. नवे विषाणू, जीवाणूही इतके प्रभावी होत आहेत, की अँटीबॉडीजलाही दाद देत नाही. त्यामुळे भविष्यातील महामारीचा विचार करता व्यापक पातळीवर संशोधन, धोरण निर्मिती नव्याने करावी लागेल. आताच त्याबाबतचे नियोजन न केल्यास पुढील महामारीत अधिक नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी अर्थसंकल्पातही सरकारला भरीव तरतूद करावी लागणार आहे. 
--- 
सध्या काही डॉक्‍टरांकडूनच लशींबाबत शंका उपस्थित केली जात आहे. लसीकरणाला आरोग्य कर्मचाऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्याबाबत काय सांगाल? 
- मुळात लसीकरणाबाबत सुरुवातीपासून भारतात शंकेचे वातावरण निर्माण झाले. प्रसंगी त्याला राजकीय रंगही देण्याचा प्रयत्न झाला. निवडणुकांमध्ये मोफत लशींचे आश्‍वासन दिल्याने लोकांच्या मनात लशींच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. तसेच लशींची माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा आपल्याकडे दिसत नाही. काही डॉक्‍टरांचा तर संशोधनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन नसल्याने अधिक गैरसमज निर्माण झाले. समाज माध्यमांवरील खोट्या माहितीचाही परिणाम लसीकरणावर झाला. लस दिल्यावर दिसणारी किरकोळ लक्षणे हे दुष्परिणाम नसून शरीरातील प्रतिकारशक्तीने लसीला दिलेला प्रतिसाद असतो. त्यामुळे लसीकरणाकडे सकारात्मकतेने पाहण्याची आवश्‍यकता आहे. किमान पदवीधरांनी किंवा औषध निर्माण शास्त्रातील विद्यार्थ्यांनी तरी लशींची माहिती घेऊन त्याच्या फायद्या-तोट्याबाबत समाजात जनजागृती करायला हवी. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा, की अमेरिकेत ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वीच लस घेतली. तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतः पुढाकार घेत लस टोचून घेतली. त्यामुळे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी स्वतः लस घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी. केवळ कोरोनावर मात करण्यासाठी लस घेण्याचा आग्रह नव्हे, तर भविष्यात येणाऱ्या इतर संसर्गजन्य आजारांसाठी कदाचित यामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होईल. 
--- 
भारतासह जगभरात लस येण्यासाठी घाई करण्यात आली का? 
- हो. लशीला मान्यता देण्यात थोडी घाईच झाली. मुळात ज्या वेळी लशीच्या विविध टप्प्यांतील चाचण्या पार पडल्यानंतर त्याच्या मान्यतेसाठी संबंधित संस्था सरकारच्या औषध नियंत्रण मंडळाकडे अर्ज करते. त्या वेळी त्रुटी, सुधारणा सुचवल्या जातात आणि मान्यतेला तीन ते चार महिन्यांचा कालावधी निश्‍चितच लागतो. कोरोनाच्या लसीवेळी असे काही झाले नाही. कारण प्रत्येक टप्प्याटप्प्यातील चाचणीच्या निष्कर्षांवर संबंधित संस्था आणि सरकार चर्चा करत होते. त्यामुळे मान्यता देताना फार काही विचार झाला नाही; अन्यथा आणखी वेळ लागला असता. 

--- 
सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या निवडक लसींमध्ये नेमका फरक काय? 
- ऑक्‍सफर्ड किंवा सीरममध्ये तयार झालेली कोव्हिशिल्ड लस ही पारंपरिक पद्धतीने तयार झालेली लस आहे. या लशींमध्ये कोरोनाचा कमकुवत विषाणू किंवा त्याचे प्रथिनांच्या स्वरूपातील घटक असतात. यामध्ये कोरोना विषाणूतील प्रथिनांचा घटक चिंपांझी माकडातील विषाणूशी जोडलेला आहे. जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे हा विषाणू रुग्णांना इंजेक्‍शनने दिला जातो. हा विषाणू निरुपद्रवी असल्याने रुग्णांवर त्याचा कोणताही अपाय होत नाही; मात्र शरीरात गेल्यावर हा विषाणू कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती करण्यास मदत करतो. त्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्तीमध्ये असणाऱ्या टी सेल्स विषाणूमुळे संसर्गित झालेल्या सामान्य पेशींना तटस्थ करतात. तसेच शरीरातील रोग प्रतिकार शक्तीमध्ये भविष्यात येणाऱ्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी सज्ज करून ठेवते. फायझर आणि मॉडर्नाची लस "एमआरएनए' तंत्रज्ञानाने तयार केली आहे. यामध्ये विषाणूंची प्रथिने इंजेक्‍शनद्वारे देण्याऐवजी जेनेटिक "एमआरएनए'मार्फत दिली जातात. हे "एमआरएनए' शरीरात सोडले जातात, तेव्हा स्नायू पेशी त्यांचे शरीरात थेट प्रथिने तयार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्यास खराखुरा विषाणू निष्प्रभ करू शकते.

Coffee with Sakal Need for more awareness about vaccination said Dr. Nanasaheb Thorat 

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com