कोरोनावरील लस मुंबईत दाखल, कांजूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या कोल्ड स्टोरेजचे काम अद्याप अपूर्ण

मिलिंद तांबे
Wednesday, 13 January 2021

कोरोनावरील लस मुंबईत दाखल झाली असली तरी महापालिकेकडून कांजूर येथे उभारण्यात येणाऱ्या कोल्ड स्टोरेजचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे.

मुंबई, ता. 13 : कोरोनावरील लस मुंबईत दाखल झाली असली तरी महापालिकेकडून कांजूर येथे उभारण्यात येणाऱ्या कोल्ड स्टोरेजचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे लशीचा साठा परळ येथील पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयात ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची लस आज अखेर मुंबईत दाखल झाली. पाहिल्या टप्प्यात कोव्हीशिल्डच्या 1,39,500 कुप्या मुंबईत आणण्यात आल्या आहेत. मुंबईत सर्वाधिक बाधित रुग्णांसह लोकसंख्येने मोठे शहर असल्याने मुंबईत 1 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लशीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेने मुख्य रुग्णालयांसह कांजूर येथे अद्ययावत शितगृहाची निर्मिती सुरू केली. 

मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एका वेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परळ येथे एफ दक्षिण येथे 10 लाख लसी साठवता येऊ शकतात, अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र साठवणूकीची मोठी क्षमता असलेल्या कांजूर येथील केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता लसीचा साठा हा एफ दक्षिण येथील लस साठवणूक केंद्रात करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले.

हेही वाचा- ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

मुंबईमधून सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाइन वर्कर अशा 2 लाख लोकांची नावे कोविन ऍपवर नोंदविण्यात आली आहेत. या दोन लाख लोकांना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. याशिवाय सर्वांसाठी लस बंधनकारक झाल्यास मुंबईत साधारणता दीड कोटी लोकांना लस द्यावी लागू शकते. यासाठी लस मोठ्या प्रमाणात साठवून ठेवावी लागली तर ती कांजूरमार्ग येथे कोल्ड स्टोरेजमध्ये साठवली जाईल. मात्र त्यापेक्षा कमी प्रमाणात लस आल्यास ती परळ एफ साऊथ आणि इतर कोल्ड स्टोरेज मध्ये साठवली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

रेफ्रिजरेटर आणण्याचे काम सुरू 

कोरोना लस 2 ते 8 अंश सेल्सियस तापमान आवश्यक आहे. यासाठी विशिष्ट प्रकारचे रेफ्रिजरेटर आवश्यक आहेत. हे रेफ्रिजरेटर कांजूरच्या कोल्ड स्टोरेजमध्ये अद्याप आणले नव्हते. ते आणण्याचे काम आता युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून दोन दिवसात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग

मुंबई महानगरपालिकेने 275 मास्टरट्रेनर तयार केले आहेत. त्यांच्या माध्यमातून 2500 कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. 5 कर्मचाऱ्यांची एक टीम या प्रमाणे 500 टीम तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात करता यावे म्हणून आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी 5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

cold storage facility for keeping covid vaccine is not yet ready in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold storage facility for keeping covid vaccine is not yet ready in mumbai