अकरावी ऑनलाईन प्रवेशाला लेटमार्क 

तेजस वाघमारे
मंगळवार, 16 मे 2017

ऑनलाईन प्रक्रियेची एजन्सी यंदा बदलली आहे. माहिती पुस्तिका तयार होऊन आठवडाभरात शाळांपर्यंत पोहचतील. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल आणि महाविद्यालयेही वेळेत सुरू होतील. 
- बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग 

मुंबई - मुंबई महानगर प्रदेशात राबवण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला यंदा लेटमार्क लागला आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी कंपनी नियुक्त करण्यास विलंब झाल्याने प्रवेशाचे वेळापत्रक चुकत आहे. माहिती पुस्तिका तयार करणे, अधिकारी व शिक्षकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांकडून पहिल्या टप्प्याचा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे यंदा अकरावी प्रवेशाचा गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. या गोंधळामुळे महाविद्यालये उशिरा सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगर परिसरातील अकरावीचे प्रवेश केवळ ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. शिक्षण उपसंचालक विभागामार्फत या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. "एमकेसीएल' कंपनीच्या मदतीने काही वर्षे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. यंदा प्रवेशाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार नोएडा येथील "नायसा' या कंपनीची नियुक्ती झाली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत अद्याप महाविद्यालयांची नावे, गतवर्षीची कट ऑफ, शुल्क आदी माहिती असलेली पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आजवर शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण देता आलेले नाही. या प्रकारामुळे यंदा अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब लागणार आहे. 

गतवर्षी विद्यार्थ्यांकडून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरून घेण्यास 2 मे रोजी सुरुवात झाली होती. 2014-15 या शैक्षणिक वर्षात 15 एप्रिलला माहिती पुस्तिका शाळांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा 16 मे उजाडला तरी माहिती पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे यंदाची ऑनलाईन प्रक्रिया लांबण्याची शक्‍यता आहे. दहावीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता धूसर आहे. निकालानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास अर्ज सादर करण्याच्या संकेतस्थळावर ताण येऊन गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने तातडीने ऑनलाइन प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शाळा करत आहेत. 

Web Title: college online admission issue