महाविद्यालयांकडून विद्यापीठ कायद्याची पायमल्ली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

महाविद्यालयांनी सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांचे अध्यापन करण्यासाठी बारावी ते पदवी मिळवलेल्या अपात्र व्यक्तींची नेमणूक केली आहे

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठ कायदा धाब्यावर बसवला आहे. महाविद्यालयांनी सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांचे अध्यापन करण्यासाठी बारावी ते पदवी मिळवलेल्या अपात्र व्यक्तींची नेमणूक केली असल्याचा धक्कादायक आरोप सिनेट सदस्य प्राध्यापक वैभव नरवडे यांनी सिनेट बैठकीत केला.

या महाविद्यालयांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. 
विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये अनुदानित आहेत. या महाविद्यालयांना सरकारच्या अनुदानावर समाधान मानावे लागते. त्यामुळे आर्थिक फायदा मिळविण्यासाठी अनेक महाविद्यालयांनी सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम सुरू केले आहेत. याचे शुल्क महाविद्यालय आपल्याला हवे तसे वसूल करत असल्याने विद्यार्थ्यांची लूट होत आहे. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाचे अध्यापन करण्यासाठी महाविद्यालयांनी पात्र प्राध्यापकांची नेमणूक करणे अपेक्षित आहे. असे असतानाही महाविद्यालयांनी बारावी ते पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांची नेमणूक केली आहे.

विद्यापीठाशी संलग्न सुमारे 250 हून अधिक महाविद्यालये विद्यापीठ कायद्याचे पालन करत नसल्याबाबत नरवडे यांनी सिनेट बैठकीत स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी अनुमोदन दिले. 

महाविद्यालयांकडून विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी योग्य होत नसल्याची, खातरजमा करून संबधीत महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी नरवडे यांनी केली. यासह नरवडे यांनी महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांची पदे तातडीने भरण्याबाबत कार्यवाही करण्याचीही प्रशासनाला विनंती केली. 

web title :Colleges are not following University Laws


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colleges are not following University Laws