विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

 पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘सकाळ’चे प्रयत्न...

मुंबादेवी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला संस्कारक्षम उत्तेजना मिळावी म्हणून सकाळ माध्यम समूहातर्फे घेतलेल्या ‘सकाळ स्कॉलरशिप सराव परीक्षेला’ विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या युगात ‘सकाळ’ने आरंभलेल्या सराव परीक्षा उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये या उपक्रमाचे भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) प्रायोजक आहेत.

सकाळ माध्यम समूहाने मुंबईतील मराठी आणि इंग्लिश माध्यमाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, त्यांची भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षा यूपीएससी, एमपीएससी, सीईटी, नेट व सेट, वैज्ञानिक, पायलट, मिलिटरी ऑफिसर्स, डॉक्‍टर, इंजिनीयर, आर्किटेक्‍चर, न्यूमेरिक सायन्स आदी क्षेत्रांत होणाऱ्या परीक्षेसाठी उत्तम मार्गदर्शन मिळावे यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार रविवारी ही स्कॉलरशिप सराव परीक्षा झाली. या परीक्षेसाठी शिरोडकर शाळेने चांगले सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या संख्येपुढे शाळेचे वर्गही अपुरे पडले. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता असे भाव होते. पालकही त्यांना शेवटपर्यंत सूचना देत होते. प्रत्येक वर्गावर परीक्षक नेमले होते. परीक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थोडे गंभीर भाव होते. त्यांना पालक आणि परीक्षक सर्व गोष्टी समजावून सांगत होते. ‘सकाळ’च्या उपक्रमाबद्दलची उत्सुकताही त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होती.

दोन सत्रांत ही सराव परीक्षा झाली. परीक्षा केंद्राच्या बाहेर असलेल्या ‘सकाळ’च्या कर्मचाऱ्यांना पालकांनी या उपक्रमाबद्दल अनेक प्रश्‍न विचारले. अनेकांनी या उपक्रमाला साह्य करण्याचीही तयारी दाखवली. मुले परीक्षा देऊन बाहेर आल्यावर त्यांना परीक्षेबद्दल विचारताना सर्वांची एकच धांदल उडाली. सर्वांनी या सराव परीक्षेबद्दल समाधान व्यक्त केले. इंग्लिश आणि मराठी शाळांची ७५१ मुले या परीक्षेला बसली होती. ‘कनक प्रतिष्ठान’चे विश्‍वस्त कैलास चव्हाण, दिलीप बारस्कर, एस.जी. घरत व कार्यवाह सुभाष जगताप यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. या परीक्षेचा निकाल लवकरच ‘सकाळ’मधून जाहीर केला जाणार आहे.

Web Title: Competitive Examination guidance