घटस्फोटानंतर तक्रारीला अर्थ नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

तपशील अमान्य
घटस्फोटानंतर पतीने संबंधित महिलेला पाठवलेले संदेश, नातेवाइकांच्या घरातील कार्यक्रमादरम्यान काढलेली छायाचित्रे, दूरध्वनीचा तपशील दाखल केला होता. या तपशिलातून आमच्यात कौटुंबिक संबंध आहेत, असा दावा तिने केला होता. मात्र तो न्यायालयाने अमान्य केला. याचिकादार महिलेचा घटस्फोट २००८ मध्ये झाला आहे आणि तिने तक्रार २००९ मध्ये केली आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

मुंबई - घटस्फोट झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये कौटुंबिक नातेसंबंध कायम राहत नाही. त्यामुळे एखादी महिला पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवू शकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला. घटस्फोटानंतर पतीविरोधात संबंधित महिलेने केलेली फिर्यादही न्यायालयाने रद्द केली.

नागपूरमध्ये राहणाऱ्या महिलेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केली होती. तिचा जुलै- १९९९मध्ये विवाह झाला होता. तिला दोन मुलेही आहेत. लग्नानंतर काही वर्षांतच कुरबुरी सुरू झाल्याने नवऱ्याने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. तो स्थानिक कुटुंब न्यायालयाने मंजूर केला. जून-२००८ मध्ये या दांपत्याचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर एका वर्षाने त्या महिलेने पतीविरोधात दंडाधिकारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत तक्रार दाखल केली. मात्र, २००८ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये कौटुंबिक संबंधच नव्हते. त्यामुळे ती पतीविरोधात फिर्याद दाखल करू शकत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The complaint after divorce does not make sense High Court