"ओसी' मिळाल्यानंतरही  बिल्डरविरोधात तक्रार शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

 सदनिकेचा ताबा मिळून भोगवटा (ओसी) प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरही घरखरेदीदार विकासकाविरोधात तक्रार दाखल करू शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल बांधकाम व्यवसायासंबंधी अपिलीय लवादाने नुकताच दिला. 

मुंबई -  सदनिकेचा ताबा मिळून भोगवटा (ओसी) प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरही घरखरेदीदार विकासकाविरोधात तक्रार दाखल करू शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल बांधकाम व्यवसायासंबंधी अपिलीय लवादाने नुकताच दिला. 

सदनिका देताना सर्व सोई-सुविधा न दिल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी अशोक खलाडकर या ग्राहकाने विकासकाविरोधात "महारेरा'कडे तक्रार केली होती. त्यावर विकासकाने खरेदी किमतीच्या 28 लाख 40 हजार या रकमेसह 10.5 टक्के व्याज द्यावे, असा आदेश "महारेरा'ने दिला. त्याविरोधात विकासकाने लवादाकडे अपील केले होते. लवादाने पैसे देण्यासंदर्भातील आदेश रद्द केला; मात्र सोई-सुविधांबद्दलच्या तक्रारींबाबत ग्राहकाच्या बाजूने निकाल लागला. "ओसी' मिळाल्यानंतरही ग्राहक सर्वच बाबतीत तक्रार करू शकतात, असे लवादाने स्पष्ट केले. 

खलाडकर आणि विकासकादरम्यान डिसेंबर 2014 मध्ये विक्री करार झाला होता. त्यानुसार डिसेंबर 2017 मध्ये सदनिकेचा ताबा मिळणार होता. त्यानुसार विकासकाने जुलै 2017 मध्ये "ओसी' देत घराची उर्वरित रक्कम (4 लाख 70 हजार) नोव्हेंबर 2017 पूर्वी जमा करण्यास सांगितले. मात्र, ही रक्कम देण्यास ग्राहक असमर्थ ठरल्याने विकासकाने विक्री करार रद्द केला. करार रद्द करण्यापूर्वी नोटीस न दिल्याने ही कृती योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवत लवादाने विकासकावर ताशेरे ओढले. त्यामुळे ग्राहकाला मिळालेला घराचा ताबा कायम राहिला; मात्र त्याला नुकसानभरपाई मिळाली नाही. "ओसी' मिळाल्यावर तक्रार करता येत नाही, हा बिल्डरचा दावा लवादाना अमान्य केला. 

Web Title: Complaint against builder may be possible even after getting OC

टॅग्स