व्हायरल व्हिडिओनंतर गौरीशंकर मिठाईवाला विरोधात FDAकडे तक्रार

मिलिंद तांबे
Monday, 28 September 2020

दक्षिण मुंबईत गौरीशंकर  मिठाईवाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता चक्क रस्त्यावर साठलेल्या पाण्याने मिठाई ठेवण्याची कपाटे आणि साहित्य धुवून काढली.

मुंबई : रस्त्यावरील पावसाच्या साचलेल्या पाण्याने मिठाई ठेवण्याची कपाटे आणि मिठाईचे साहित्य काही कामगार धुवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ अनसुरकर यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला (एफडीए)तक्रार दिली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या मिठाईवाल्यावर कारवाईची मागणी केली आहे. 

मुंबईत कोविडसारख्या रोगाने थैमान घातले आहे. अशात दक्षिण मुंबईत गौरीशंकर  मिठाईवाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता चक्क रस्त्यावर साठलेल्या पाण्याने मिठाई ठेवण्याची कपाटे आणि साहित्य धुवून काढली. अनसुरकर यांनी हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या प्रकाराविरोधात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचाः  दहिसर मीरा रोड रेल्वे स्थानकांदरम्यानच्या, रेल्वे रुळांवर लोखंडी तुळया टाकण्याचे काम पूर्ण

मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईची तुंबई झाली. पालिकेकडून पाणी उपसण्याचे काम सुरू होते. तर दुसरीकडे रस्त्यावरच्या पाण्याने आपल्या दुकानाची स्वच्छता करण्यात दुकानातील कर्मचारी गुंतले होते. राजरोसपणे हा प्रकार सुरू होता. रस्त्यावरील पाण्याने कर्मचारी ज्या वस्तू धुवत होते त्या वस्तू मिठाई ठेवण्यात येत असल्याचे अनसुरकर यांचे म्हणणे आहे. 

अधिक वाचाः  म्हणे, डायरेक्ट आयपीएस अधिकारी बनवतो; पण झाली तब्बल 3 कोटींची फसवणूक

या प्रकारामुळे मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याविरोधात अनसुरकर यांनी पालिकेच्या एफ दक्षिण विभाग, आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. मात्र पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे अनसुरकर यांनी एफडीएकडे तक्रार करून दुकान चालकावर कारवाईची मागणी केली आहे.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Complaint FDA against Gaurishankar Mithaiwala Parel after viral video


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint FDA against Gaurishankar Mithaiwala Parel after viral video