वडोल गावाचा अर्धवट पूल 15 दिवसात पूर्ण करा : आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

दिनेश गोगी
रविवार, 3 जून 2018

पुलाचा शेवटचा कॉलम आणि स्लॅब बाकी असून हे काम पूर्ण करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.त्यावर आयुक्त गणेश पाटील यांचा देखील वॉच असणार असल्याने येत्या 15 दिवसात हा पूल खुला होणार असल्याची माहिती शिवाजी रगडे,टोनी सिरवानी यांनी दिली.

उल्हासनगर : संततधार पावसाळ्यात दोन वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या आणि त्यात एका लहान विद्यार्थ्याचा बळी घेतलेल्या वडोल गावाच्या पुलाचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. आयुक्तांनी या पुलाची पाहणी केली असून, येत्या 15 दिवसात या पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते पाहता हा पूल विद्यार्थी आणि नागरिकांसाठी खुला होणार, असा विश्वास नगरसेवक शिवाजी रगडे, टोनी सीरवानी यांनी व्यक्त केला आहे.

रिपाइं आठवले गटाच्या नगरसेविका पंचशीला पवार ह्या उपमहापौर असताना वालधुनी नदीवर असलेला लहान पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्यात एका विद्यार्थ्याचा बळी गेला होता. रिपाइंचे प्रदेश सचिव व उपमहापौर पंचशीला पवार या दाम्पत्याने तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेतल्यावर नव्या आणि मोठ्या पुलाच्या उभारणीसाठी निधीची तरतूद केली होती. मात्र, कामात कासवगती ठेवण्यात आल्याने या पुलाचे काम अधांतरी लटकले होते.

2017 च्या पालिका निवडणुकीत निवडून आलेले शिवाजी रगडे, टोनी सिरवानी यांनी या पुलासाठी पाठपुरावा सुरू केल्यावर पुलाच्या कामास थोडी गती मिळाली असली तरी काम अंतिम टप्प्यात पोहचत नव्हते. शेवटी रगडे,सीरवानी यांनी आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे या पुलासाठी साकडे घातले.पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप जाधव,ठेकेदार रोहित रामचंदानी यांच्या सोबत पुलाची पाहणी केली आणि 15 दिवसात पुलाचे काम पूर्णत्वास आणण्याचे आदेश दिले.

पुलाचा शेवटचा कॉलम आणि स्लॅब बाकी असून हे काम पूर्ण करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.त्यावर आयुक्त गणेश पाटील यांचा देखील वॉच असणार असल्याने येत्या 15 दिवसात हा पूल खुला होणार असल्याची माहिती शिवाजी रगडे,टोनी सिरवानी यांनी दिली.

Web Title: Complete Vadol village partial pool next 15 days Commissioner orders to officers