भरपावसात स्थलांतर पोलिस कुटुंबांकडून पालिकेच्या आदेशाचे पालन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018


वर्तकनगर पोलिस वसाहतीतील इमारती धोकादायक झाल्याने येथील नागरिकांना त्वरित घर खाली करण्यास सांगितले. या कुटुंबांना भाईंदरपाडा येथे स्थलांतरित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

- संजीव जयस्वाल, पालिका आयुक्‍त, ठाणे 

ठाणे : वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेल्या सात इमारती शनिवारी पालिका आयुक्‍त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानंतर तातडीने रिकाम्या करण्यात आल्या. आयुक्‍तांच्या आदेशामुळे 330 पोलिस कुटुंबांना भरपावसात भाईंदरपाडा येथील गृहसंकुलात स्थलांतरित व्हावे लागले. आयुक्‍त जयस्वाल यांनी या कुटुंबांची भेट घेत संभाव्य धोक्‍याच्या दृष्टिकोनातून इमारती रिकाम्या करण्याबाबत समजूत काढली. 

भाईंदरपाडा येथील गृहसंकुल लांब असल्याने पोलिस कुटुंबांनी जवळच्या परिसरात घर देण्याची मागणी पालिकेकडे केली होती, परंतु आयुक्त जयस्वाल यांनी शनिवारी या कुटुंबांची भेट घेत त्यांना त्वरित घरे खाली करण्याचे आदेश दिले. मागील 30 ते 40 वर्षांपासून वर्तकनगर पोलिस वसाहतीत राहणाऱ्या या कुटुंबांचे लोढा स्प्लेंडर गृहसंकुलामध्ये स्थलांतर करण्यात आले. ही कुटुंबे वसाहतीची पुनर्बांधणी आणि मालकी हक्कासाठी लढा देत आहेत.

इमारती मोडकळीस आल्याने त्या खाली करण्यासाठी पोलिसांची कुटुंबे तयार आहेत; मात्र त्यांना वर्तकनगर परिसरातील आकृती गृहसंकुलात किंवा केवरा सर्कल येथील वसाहतीत घरे द्यावीत, अशी त्यांची मागणी होती. 

मुलांच्या शाळांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. आता शाळा बदलणे शक्‍य नाही. परिणामी, पावसाळ्यात मुलांना 15 ते 16 किलोमीटरचा प्रवास करून शाळा गाठावी लागणार असल्याचे म्हणणे कुटुंबांनी मांडले होते; मात्र पालिका आयुक्‍तांच्या आदेशावरून या कुटुंबांनी अखेर शनिवारी भरपावसात भाईंदरपाडा येथे स्थलांतर केले. त्यांना स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने सर्वतोपरी मदत पुरवली. 

आकृती गृहसंकुलात घरे देण्याचा प्रयत्न 

आयुक्तांनी आदेश दिल्याने आम्ही येथील घरे तातडीने रिकामी करत आहोत. आकृती येथील गृहसंकुले तयार होत आहेत. तेथे घर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. वर्तकनगर पोलिस वसाहतीतील मालकी हक्काच्या घरासाठीही पालिका पूर्ण सहकार्य करेल, असे आश्‍वासन पालिका आयुक्तांनी दिल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: Complying with the order of the Municipal Corporation for migrant police