असंघटित कामगारांसाठी सर्वसमावेशक धोरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - राज्यातील विविध क्षेत्रांतील असंघटित कामगारांसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून येत्या दोन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबई - राज्यातील विविध क्षेत्रांतील असंघटित कामगारांसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून येत्या दोन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य सुनील शिंदे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्यातील सर्व क्षेत्रांतील असंघटित कामगारांसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून येत्या दोन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि यासाठी असलेला निधी खर्च करण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात येईल. एका उपप्रश्‍नाला उत्तर देताना कामगार राज्यमंत्री विजय देशमुख म्हणाले, की राज्यातील विविध क्षेत्रांतील असंघटित कामगारांसाठी एकच सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात येईल. यामध्ये सर्व क्षेत्रांतील कामगारांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या 122 विविध क्षेत्रांतील कामगारांची यादी तयार असून, उर्वरित सर्वांच्या नाव नोंदी लवकरच करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले. राज्यातील असंघटित कामगारांसाठी स्थापन करण्यात येणारे सुरक्षा मंडळ सर्वंकष व्हावे, यासाठी एक अभ्यासगट स्थापन करावा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती देशमुख यांनी मान्य केली. या चर्चेत सदस्य आशिष शेलार, भारती लव्हेकर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, मेधा कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Comprehensive policy for unorganized workers