रेंगाळलेला शपथविधी मार्गी लागणार 

रेंगाळलेला शपथविधी मार्गी लागणार 

मुंबई - गेले कित्येक महिने रेंगाळलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अखेर मुहूर्त मिळेल, अशी चिन्हे आहेत. मात्र केंद्रात अरविंद सावंत यांना अतिरिक्‍त मंत्रालयाची जबाबदारी मिळत नाही, तोवर विस्तारात सहभागी होणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. 

कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट आमदारकीचाच राजीनामा दिल्याने मुलगा सुजयच्या पक्षप्रवेशावेळीच राधाकृष्ण यांना दिलेला मंत्रिपदाचा शब्द भाजप पाळणार, असे दिसते आहे. "पावसाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल' हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान प्रत्यक्षात येईल, अशी चिन्हे आहेत. विखे पाटील यांच्या संपर्कात काही कॉंग्रेस आमदार असले, तरी भाजपमध्ये त्यांचे पुनर्वसन होईल काय, याबाबत प्रश्‍न असल्याने सध्या ते एकटेच पक्ष बदलतील, असे दिसते. विधिमंडळ प्रणालीतील एक महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे विदर्भातील एक आमदार त्यांच्या मित्रासह प्रवेशाची शक्‍यता वर्तवण्यात येत होती. त्यांना भाजप उमेदवारीची हमी देईल काय, असे प्रश्‍न महत्त्वाचे असल्याने सध्या शांतता बाळगली जाते आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याइतपत त्यांनी उत्तम कामगिरी नोंदवली, असे मानले जाते आहे. मुंबईतील दोन मंत्र्यांना अर्धचंद्र दिला जाणार, अशी भाजप वर्तुळात चर्चा आहे. मात्र त्याबाबत कुणीही काही बोलण्यास तयार नाही. केंद्रातले सरकार स्थिरस्थावर झाल्यावर राज्यात विस्तार होईल, असे मानले जात होते. मात्र प्रत्यक्षात सहा जूनला शपथविधी होण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेना नाराज 
"जेडीयू' नेते नितीशकुमार यांच्याप्रमाणे शिवसेनेने मंत्रिमंडळात यायचेच नाही, असे ठरवलेले नाही. अरविंद सावंत यांचा समावेशही झाला मात्र त्यांना अधिक चांगले खाते द्या, ही मागणी मान्य होत नाही तोवर राज्यात कोणतीही चर्चा नाही, असे शिवसेनेने ठरवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com