यशासाठी आत्मविश्‍वास महत्त्वाचा- डॉ. राम गुडगिला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्‍वासपूर्वक वागणे आवश्‍यक आहे. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे वागतो, कसे बोलतो याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे समोरच्या माणसाचे पूर्ण ऐकून घेतल्यानंतरच आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी, असा सल्ला व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शक डॉ. राम गुडगिला यांनी तरुणांना दिला. 

नवी मुंबई : जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्‍वासपूर्वक वागणे आवश्‍यक आहे. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे वागतो, कसे बोलतो याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे समोरच्या माणसाचे पूर्ण ऐकून घेतल्यानंतरच आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी, असा सल्ला व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शक डॉ. राम गुडगिला यांनी विद्यार्थांना दिला. 

महाविद्यालयीन विद्यार्थांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा. तसेच तरुण पिढीसमोर सध्या कोणती आव्हाने आहेत, याबाबत माहिती मिळावी या हेतूने ‘सकाळ समूहा’च्या यिनतर्फे व वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने खास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (ता.१९) कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात करण्यात आले होते. ‘सकाळ- यिन संवाद’ कार्यक्रमात गुडगिला यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, उपप्राचार्य सी. डी. भोसले व ज्युनिअर महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी. डी. बोटे, तसेच शिक्षकांसह कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.

तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात छाप मारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व करणारे लिडर कशा पद्धतीने वागतात, बोलतात यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहावेत. त्यामुळे चारचौघांत वागण्याच्या टिप्स लक्षात येतील, असे गुडगिला यांनी विद्यार्थांना सांगितले. तसेच जास्तीत जास्त वाचन करून आपले ज्ञान वाढवावे. त्यामुळे विषयामध्ये असणाऱ्या परिपूर्ण ज्ञानाचा बोलताना वापर होईल. तसेच जर एखादा विषय समजला नाही तरी निसंकोचपणे समोरच्याकडून समजून घेण्याचा सल्ला विद्यार्थांना दिला. न्यूनगंड न बाळगता बिनधास्तपणे आत्मविश्‍वासपूर्वक वागावे, असे गुडगिला यांनी विद्यार्थांना सांगितले. यावेळी विद्यार्थांना देण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थांमधील आत्मविश्‍वासही वाढल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थांनी व्यक्त केल्या.

‘सकाळ- यिन संवाद’कडून विद्यार्थांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी घेण्यात आलेला हा कार्यक्रम उत्स्फूर्त असा आहे. यामुळे विद्यार्थांना देण्यात आलेल्या सल्ल्याचा नक्कीच त्यांना भावी जीवनामध्ये फायदा होईल. विद्यार्थांना शिक्षणाबरोबरच समाजात कसे राहावे याचेही ज्ञान आवश्‍यक आहे.
- डॉ. व्ही. एस. शिवणकर, प्राचार्य.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confidence is key to success - Dr. Ram Gudgila