पक्षांतराच्या चर्चेने नवी मुंबईत खळबळ

पक्षांतराच्या चर्चेने नवी मुंबईत खळबळ
पक्षांतराच्या चर्चेने नवी मुंबईत खळबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५७ नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये जाण्याच्या घेतलेल्या एकमुखी निर्णयाने नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेली पाच वर्षे विरोधात बसल्यानंतर पुढील पाच वर्षे सत्तेची फळे चाखायला मिळणार असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदीआनंद साजरा होत आहे; तर काहीही नसताना जिवंत ठेवणाऱ्या निष्ठावंतांमुळे भाजपमध्ये सावध भूमिका घेतली आहे. मोठ्या संख्येने पक्षात आयारामांची भरती होणार असल्याने अनेक वर्षे ठाण मांडून बसणाऱ्या निष्ठावंतांवर अन्याय तर होणार नाही ना, अशी शंका भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

ऐरोलीचे आमदार संदीप नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती. मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एक पाऊल पुढे टाकून चक्क भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांच्या दबावापोटी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आता प्रवेश करावा लागेल अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. रविवारी संपूर्ण दिवसभर प्रसिद्धिमाध्यमे व समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांमुळे नवी मुंबईचे राजकीय वातावरण निवडणुकींच्या घोषणांआधीच तापले आहे. या तापलेल्या तव्यावर राष्ट्रवादीची नेतेमंडळी आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. 

नगरसेवकांच्या बैठकीचे पारसिक हिलवरील महापौर निवासस्थानी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे झाडून सर्व नगरसेवक न चुकता पोहोचले होते. या बैठकीला नेहमीप्रमाणे संबोधित करायला नाईक कुटुंबांतील कोणीच नव्हते. फक्त जिल्हाध्यक्ष अनंत सुतार हेच नगरसेवकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत होते. देशभरात मोदी या नावाची चाललेली जादू ते उपस्थित नगरसेवकांना सांगत होते. सुतार यांनी नगरसेवकांपुढे मोदीपुराण वाचल्यानंतर सर्व नगरसेवकांनी हात वर करून भाजपमध्ये जाण्याचा एकहाती निर्णय जाहीर केला. आता हा निर्णय मंगळवारी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या व्हाईट हाऊसवर जाऊन त्यांना सांगण्याचेही ठरले. 

नगरसेवकांच्या या बैठकीमुळे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. देशात व राज्यात सत्ता नसतानाही पक्षाला जिवंत ठेवणाऱ्या निष्ठावंतांना आपल्यावर अन्याय तर होणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. शहरातील सत्ताकेंद्रे बदलली तर कोणाला नेता मानायचा असा प्रश्‍न भाजपच्या पदाधिकाऱ्यांपुढे पडला आहे. 

भाजप किंवा शिवसेनेत कोणीही नेते व पदाधिकारी प्रवेश करणार असतील तर त्यामुळे युतीची ताकद आणखीनच वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागतच आहे. 
- विजय नाहटा, उपनेते, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com