शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा सावळा गोंधळ; नियोजनाअभावी कल्याण-डोंबिवलीत तारांबळ

सुचिता करमरकर | Friday, 20 November 2020

राज्यभरात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे;

कल्याण : राज्यभरात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे; मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात चाचणी केंद्रांवर शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने व त्यात अपुऱ्या साधनसाम्रुगीमुळे गोंधळ उडत आहे. अनेक केंद्रावर प्रशासनाच्या नियोजनाअभावी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असून चाचणासाठी शिक्षकांना जवळपास तीन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - भाजप काळात सीबीआयची अवस्था पानटपरीसारखी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह!

पालिकेने शिक्षकांच्या मोफत तपासणीसाठी पाच केंद्रे निश्‍चित केली आहेत. राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे 17 ते 22 नोव्हेंबरदरम्यान शिक्षकांना स्थानिक प्रशासकीय यंत्रणांमार्फत कोरोना तपासणीसाठी मोफत व्यवस्था उपलब्ध करुन देणे आवश्‍यक होते. परंतु कल्याण-डोंबिवलीमध्ये 17 तारखेपर्यंत यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या नव्हत्या. शिक्षक संघटनांच्या प्रयत्नांनंतर पालिकेने रुक्‍मिणीबाई हॉस्पिटल, शास्त्री नगर हॉस्पिटल तसेच अन्य तीन ठिकाणी शिक्षकांसाठी हि केंद्रे सुरु केली. परंतु येथे उपलब्ध साधनसामग्री आणि तपासणीसाठी आलेल्या शिक्षकांच्या संख्येत मोठी तफावत आढळून येत आहे. पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची संख्या साडेतीन हजारापर्यंत आहे. याव्यतिरिक्त ठाणे, मुंबई तसेच लगतच्या परिसरातील सरकारी तसेच खाजगी शाळांमध्ये कार्यरत असणारे दीड ते दोन हजार शिक्षक कल्याण डोंबिवली शहराचे नागरिक आहेत. या शिक्षकांनीही पालिका केंद्रांवर तपासणीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे चाचणीसाठी त्यांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत होते. 

 

पालिकेची दोन रुग्णालय तसेच इतर तीन ठिकाणी शिक्षकांच्या तपासणीसाठी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उद्यापासून क्रस्ना डायग्नोस्टिक लॅबतर्फेही तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल. 
- डॉ  प्रतिभा पानपाटील
वैद्यकीय अधिकारी, कडोमपा  

The confusion of the teachers corona test Lack of planning in Kalyan Dombivali 

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )