Bhai Jagtap : मुंबई महानगरपालिकेच्या एफडीवर पंतप्रधानांचा डोळा; भाई जगताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress Bhai Jagtap over mumbai budget 2023 pm narendra modi politics mumbai

Bhai Jagtap : मुंबई महानगरपालिकेच्या एफडीवर पंतप्रधानांचा डोळा; भाई जगताप

मुंबई : मुंबईतील अर्थसंकल्प म्हणजे मुंबईच्या तिजोरीवर डोळा ठेवून मांडलेला अर्थसंकल्प असल्याची टीका मुंबई कॉंग्रेसने केली आहे. पंतप्रधानांनी मुंबई दौऱ्यात विकास कामांचे उद्धाटन केले खरे, पण त्यांचे सर्व लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या बॅंकेतील ठेवीवर होते.

त्याचाच प्रत्यय हा प्रशासकांच्या माध्यमातून मांडलेल्या मुंबईकरांच्या बजेटमधून आला आहे, अशी टीका मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. येत्या दोन ते तीन वर्षात पालिकेतील ठेवी रिकाम्या होतील, अशीही भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रशासकांनी पंतप्रधानांच्या आणि राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच हा अर्थसंकल्प मांडला असल्याची टीका त्यांनी केली. मुंबईच्या अर्थसंकल्पातून आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विभागातील आर्थिक तरतुदींना कात्री लावण्यात आली आहे.

हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतून मुंबईभर सर्वसामान्यांसाठीच्या आरोग्यासाठी दवाखाने तयार करण्यात येत आहेत. परंतु या दवाखान्यांसाठी ५० कोटींची मोठी तरतूद केल्याची टीका त्यांनी केली.

अवघ्या एका वर्षासाठी इतकी मोठी रक्कम वापरण्यात येणार आहे. मुंबईतील दीड कोटी लोकसंख्येसाठी खूपच कमी दवाखान्यांची तरतूद करण्यात आली आहे. १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना असायला हवा, परंतु आताच्या दवाखान्यांची संख्या खूपच कमी आहे.

शिवाय ४० टक्के डॉक्टरांच्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत. तसेच ४५ टक्के पॅरामेडिकल स्टाफच्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत. २० टक्के नर्सेसची पदेदेखील रिक्त आहेत. अशी स्थिती असताना दवाखान्यांची बोगस योजना चालवण्यात येत असल्याचे जगताप म्हणाले.

मुंबईतील १७०० कोटी रूपयांच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पावरही त्यांनी टीका केली. ही कामे वर्षानुवर्षे मुंबईभर सुरू आहेत. परंतु या प्रकल्पांना आमदार निधी द्यायला हवा. परंतु इथे मात्र मुंबई महानगरपालिकेतील पैशाची उधळण सुरू आहे.

त्यामुळे या सुशोभिकरणाच्या कामात भ्रष्टाचार होऊ शकतो अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी लावण्यात येणाऱ्या उपकरणांचीही त्यांनी खिल्ली उडवली. मुंबईत वाहतूक कोंडीचे इतके बॉटल्सनेक्स आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची संख्या पाहता एअर प्युरीफायरचा पर्याय हा पूरक नसल्याची टीकाही त्यांनी केली.