पोटनिवडणुकीतून कॉंग्रेस-भाजपची माघार 

पोटनिवडणुकीतून कॉंग्रेस-भाजपची माघार 

नवी मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक निवृत्ती जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 29 च्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे त्यांच्या पत्नी नीलम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवृत्ती जगताप यांचे समाजकार्य लक्षात घेत भाजप व कॉंग्रेसने या पोटनिवडणुकीत नीलम यांच्याविरोधात उमेदवार न देता त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

महापालिकेतील 111 नगरसेवकांपैकी निवृत्ती जगताप हे सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक होते. मनमिळावू आणि प्रभागातील जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी तळमळीने धावपळ करणारा नेता अशी त्यांची नवी मुंबईत ख्याती होती; मात्र अचानक त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने नवी मुंबईत सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

या परिस्थितीत रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 6 जून ही उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती. यादरम्यान राष्ट्रवादीने निवृत्ती जगताप यांच्या जागेवर त्यांच्याच पत्नी नीलम यांचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे उमेदवार न देता पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले; तर भाजपपाठोपाठ कॉंग्रेसतर्फेही नीलम जगताप यांना कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. गुरुवारी महापौर जयवंत सुतार यांची भेट घेत कौशिक यांनी लेखी पत्राद्वारे नीलम जगताप यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com