स्थानिक पातळीवर कॉंग्रेस देणार सत्ताधाऱ्यांना 'काँटे की टक्‍कर' 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 डिसेंबर 2018

मुंबई : गेल्या चार वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर असला तरी शहरांमध्ये काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला जनाधार असल्याचे दिसून येते, त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने योग्य नियोजन केल्यास सत्ताधाऱ्यांसोबत 'काँटे की टक्‍कर' होण्याची शक्‍यता आहे. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवून अव्वल असल्याचे दाखवून दिले आहे. शिवसेना सत्तेत असली तरी त्यांना ग्रामीण भागात विशेष यश मिळालेले नाही. राज्यातील सत्तांतरानंतर कायमच बॅकफूटवर राहिलेल्या काँग्रेसला शहरात, तर राष्ट्रवादीला ग्रामीण भागात चांगला जनाधार असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकाही कोणत्याही क्षणी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील यश आणि सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी पक्षांचा प्रयत्न असेल. यामध्ये मराठा आरक्षण, 72 हजार नोकरभरती आणि धनगर आरक्षणाचा ठराव या मुद्द्यांवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. 

निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी मोठी तयारी केली असली तरी गेल्या दोन वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारविरोधात सूर गवसला आहे. शेतकरी कर्जमाफी आणि अन्य प्रश्‍नांवर दोन्ही काँग्रेसने दोन वर्षांपासून रान उठवले असतानाच त्यांना अन्य पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच, फसलेली शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, वाढते गुन्हे आदी मुद्दे त्यांच्या हातात आहेत. सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरील पक्षीय बलाबल नेहमीच उपयोगी पडत असल्याचा इतिहास आहे. भाजप क्रमांक एकवर असला तरी शहरात काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाल्याचे दिसून येते, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कितीही तयारी केली तरी दोन्ही काँग्रेसने योग्य नियोजन केल्यास 'काँटे की टक्‍कर' होऊ शकते. 

Web Title: congress to fight with bjp on local level