शिवसेना चालेल; पण भाजप नको : काँग्रेस 

Congress helps shiv sena in mumabi municipal corporation election
Congress helps shiv sena in mumabi municipal corporation election

मुंबई - मुंबई महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्तेवर येऊ द्यायचे नाही. एकवेळ शिवसेना पुन्हा सत्तेवर आली तर चालेल, अशी भूमिका काँग्रेसच्या दिल्ली नेतृत्वाकडून मांडण्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती पुढे आली आहे.

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शक्‍य असेल तेथेही भाजपला रोखा, शिवसेना ही सॉफ्टटार्गेट ठेवा, अशीच रणनितीच्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भाजपला रोखण्यात यश मिळण्यास त्याचा संदेश देशभर जाईल, असे काँग्रेसच्या दिल्ली नेतृत्वाला वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

राज्यात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर, राज्याच्या सत्तेवर त्याचे परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मित्रपक्ष असतानाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटबंदीच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधी पक्षांमध्ये विशेषत: काँग्रेसमध्ये शिवसेनेबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. मुंबईसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे भाजपला एकाकी टाकण्याचे धाडस शिवसेनेने केल्याने या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले नाही तर त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतील, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. या पूर्वीही मुंबईमध्ये शिवसेनेला काँग्रेसने अप्रत्यक्ष मदत केल्याचे दिसून येते. 1985 साली शिवसेना मुंबईतून हद्दपार होणार असे वाटत असताना, मराठी माणसा जागा हो, तुझी मुंबई वेगळी करण्याचा कट रचला जात असल्याचे भावनिक आवाहन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी अमराठी उमेदवारांना जास्तीत जास्त तिकिटे काँग्रेसकडून दिली होती. त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी काँग्रेसमधील मराठी उमेदवारांना बंडखोर म्हणून उभे राहण्याचा सल्ला दिला होता. त्यातून काँग्रेस उमेदवारांच्या मतविभागणीमुळे शिवसेनेचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकला होता याची आठवण काँग्रेसच्या एका नेत्याने नाव सांगण्याच्या अटीवर दिली.

काँग्रेसची व्यूहरचना 
मुंबईत 25 टक्‍के मराठी लोकसंख्या असली तरी, मराठीबहुल भागात ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार असेल तेथे काँग्रेसने अधिक ताकद लावू नये. तसेच मुस्लिम, उत्तरभारतीय, गुजराती मारवाडी,तेलगू आदी अमराठी लोकवस्ती असलेल्या मतदारसंघावर अधिक भर देण्याची काँग्रेसने व्यूहरचना केल्याचे समजते. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार हमखास निवडून येणार असेल तेथे काँग्रेसने ताकद लावावी, अशी रणनीती ठरल्याचे समजते. 

राणे मुंबई बाहेर 
काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुंबई महापालिका प्रचारात नेहमी शिवसेनेला टार्गेट केले होते. राणे यांच्या प्रचारसभाही कोकणी आणि मराठी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी घेतल्या गेल्या होत्या. संजय निरुपम यांच्यावर नाराज होऊन मुंबईबाहेर प्रचार करणार असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, मराठी मतदारांचा फटका शिवसेनेला बसू नये म्हणून राणे यांना मुंबईच्या प्रचारापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याचे माहिती पुढे येत आहे. त्यामुळे, 227 प्रभागांपैकी 52 नगरसेवक हे काँग्रेसचे 2012 च्या निवडणुकीत निवडून आले होते. सध्याचे वातावरण पाहता काँग्रेसला महापालिकेत बहुमत मिळेल, अशी आशा वाटत नाही. त्यात काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्व परिस्थितीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करण्याची गुप्त रणनीती काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर ठरविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com