काँग्रेस म्हणतेय राम कदमांची नार्को टेस्ट करा, त्यावर कदम म्हणातात...

पूजा विचारे
Friday, 4 September 2020

कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर भाजपचे नेते राम कदम यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. त्यामुळे कंगनाची पाठराखण करणाऱ्या राम कदम यांच्यावर काँग्रेसनं निशाणा साधला आहे. 

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आपलं परखड मत व्यक्त करत असते. काही दिवसांपूर्वी तिनं मुंबई पोलिसांची भीती वाटते असं म्हटलं होतं. त्यावर तिच्यावर शिवसेनेसह काँग्रेसनंही निशाणा साधला होता. त्यानंतर कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर भाजपचे नेते राम कदम यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. त्यामुळे कंगनाची पाठराखण करणाऱ्या राम कदम यांच्यावर काँग्रेसनं निशाणा साधला आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधत विवेक मोईत्राचीही आठवण करुन दिली आहे. तसंच सचिन सावंत यांना राम कदम यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी कली आहे.  कंगनाला भाजपच्या आयटीसेलची साथ असून हे  मिळून भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

 

सचिन सावंत यांनी ट्वीट करून कंगणासह राम कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, कंगना राणावत म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व #आमचीमुंबई वर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे. 

 

सावंत यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे. 

सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये आवर्जुन विवेक मोईत्रा यांचाही उल्लेख केला आहे. विवेक मोईत्रा यांचा याआधी ड्रग्जसंदर्भात उल्लेख आला होता. मात्र ती गोष्ट राहुल महाजन यांच्या संदर्भातली होती. राहुल महाजन आणि राम कदम हे मित्र होते. त्यामुळे सचिन सावंत यांनी आवर्जुन विवेक मोईत्राच नाव घेतल्याचं बोललं जात आहे. 

सचिन सावंत यांच्या मागणीवर राम कदम यांची प्रतिक्रिया 

सचिन सावंत यांच्या ट्विटला राम कदम यांनी उत्तर दिलं आहे. राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली की, छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते , मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा.

Congress Sachin sawant tweet demand for do ram kadam narco test


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Sachin sawant tweet demand for do ram kadam narco test