शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर; वाचा काय घडले?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

आम्हाला सरकार स्थापन करायचं नाही सरकार चालवायचं आहे. त्यामुळेच आम्ही चर्चा करून मसुदा अंतिम केला आहे. तो सर्वपक्षांच्या श्रेष्टींकडे पाठवला आहे. : विजय वडेट्टीवार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या दिशेने पाऊल टाकताना आज, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला. पण, जणू बैठकीत ठरवून आल्याप्रमाणं या नेत्यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना एकच उत्तर दिले. जवळपास पंधरा मिनिटे ही पत्रकार परिषद सुरू होती. प्रत्येक पक्षांच्या नेत्याने संवाद साधला. उत्तर मात्र एकच मिळाले.

गुंता सुटला, आता शरद पवार-सोनिया गांधी अंतिम बैठक

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र करावा भाजप मुक्त : जोगेंद्र कवाडे 

पक्ष श्रेष्ठीच घेतील निर्णय
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करणार असल्याने त्यांच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रम ठरवावा, अशी पक्षाच्या वरिष्ठांची अपेक्षा होती. त्यानुसार आज, तिन्ही पक्षांच्या नेत्यांची पुन्हा एक बैठक झाली. बैठकीत आगामी सरकारच्या किमान समान कार्यक्रमावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी 'किमान समान कार्यक्रमाचा मसुदा बैठकीत तयार केला असून, तो तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना पाठविण्यात आला आहे. त्यावर आता तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी निर्णय घेतील आणि त्यानंतर पुन्हा पुढची चर्चा होईल,' एवढे एकच उत्तर दिले. या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आदी प्रमुख उपस्थित होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'सरकार चालवायचं आहे'
या वेळी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले, 'सरकार स्थापनेच्या दृष्टीने आजची बैठक महत्त्वाची होती. यात किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. यावर चर्चा व्हावी ही सगळ्या पक्षांच्या हायकमांडची इच्छा होती. आम्हाला सरकार स्थापन करायचं नाही सरकार चालवायचं आहे. त्यामुळेच आम्ही चर्चा करून मसुदा अंतिम केला आहे. तो सर्वपक्षांच्या श्रेष्टींकडे पाठवला आहे. आता श्रेष्ठी त्यावर निर्णय घेतील. सरकार स्थापन व्हावं, शेतकऱ्यांची इच्छा राज्यापुढं महत्त्वाच्या समस्या आहेत. जनतेला सरकार स्थापन झालेलं हवंय.  पुन्हा निवडणुका लादल्या जाऊ नयेत म्हणून, आम्ही एकत्र येत असून, सरकार स्थापन करत आहोत.'

कशासाठी किमान समान कार्यक्रम? 

  1. सरकार स्थापनेपूर्वीच सर्व विषयांवर चर्चा होणे अपेक्षित 
  2. किमान समान कार्यक्रमासाठी तिन्ही पक्षांचे वरिष्ठ आग्रही 
  3. तीन पक्ष पहिल्यांदाच एकत्र येऊन सरकार स्थापन करत आहेत 
  4. सरकार केवळ स्थापन करायचे नाही तर चालवायचे आहे 
  5. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट, शेतकऱ्यांना स्थिर सरकार हवे आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress shiv sena ncp leaders joint press conference after meeting