‘आरे’साठी काँग्रेस-शिवसेना एकत्र - जयराम रमेश

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मेट्रो हवी पण...
‘आरे’ची वनजमीन पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे आणि या जागेवर मागील काही वर्षांपासून मुंबई शहरातील खूप लोकांचा डोळा आहे, हेही तितकेच खरे आहे. मुंबईसारख्या शहराला मेट्रोची गरज आहे, या मताचा मीही आहे. विकासाला आमचा विरोध नाही; पण हा विकास सुनियोजित असायला हवा. पर्यावरण आणि विकास यांच्यात संतुलन असायला हवे, असेही या वेळी जयराम रमेश म्हणाले.

मुंबई - काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी ‘आरे’तील वृक्षतोडीविरोधात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. त्यामुळे ‘आरे’साठी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांनी मंगळवारी आंदोलकांची भेट घेतली. तसेच, त्यांनी तेथील प्रस्तावित मेट्रो कारशेड परिसराची पाहणी केली.

जयराम रमेश हे वन व पर्यावरण विभागाचे भारतीय संसदेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. ‘आरे’तील मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणाऱ्या आदिवासी समाज आणि ‘सेव्ह आरे’ संस्थेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. पत्रकारांशी बोलताना रमेश म्हणाले, की पर्यावरणाच्या प्रश्‍नावर शिवसेनेने योग्य भूमिका घेतली आहे. विकास झाला पाहिजे; मात्र तो पर्यावरण सुरक्षित ठेवून व्हावा. शिवसेनेने निव्वळ भूमिका घेऊन उपयोग नाही, तर त्यापुढे जाऊन प्रत्यक्ष आंदोलनात उतरावे. ‘आरे’बाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बोलण्याने आनंद झाला. मेट्रो कारशेडच्या बहाण्याने ‘आरे’च्या हिरव्यागार जमिनीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, असा आरोपही रमेश यांनी केला. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, ‘सेव्ह आरे’चे सदस्य स्टालिन आदी या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Shivsena Compromise for aare tree cutting oppose jairam ramesh