‘काँग्रेसबरोबरची राजकीय गुलामगिरी संपुष्टात’ - ॲड. प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

काँग्रेस-राष्ट्रवादी काय करणार?
वंचित आघाडीच्या कामगिरीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्‍टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची जाणीव सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काय प्रयत्न करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासोबतच राजकीय गुलामीही संपुष्टात आली आहे, त्यामुळे आता काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवरच व्हावी, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. जागावाटपाच्या चर्चेत वंचित आघाडीला सहा जागा सोडण्याची तयारी काँग्रेस आघाडीने दाखवली होती. मात्र, पुढे जागावाटपावरून ही बोलणी फिस्कटली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीत याचा मोठा फटका बसला होता. 

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम आणि अन्य घटकांसोबत केलेल्या दलित-मुस्लिम-ओबीसी एकीने काँग्रेस आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फोडली. प्रकाश आंबेडकरांनी सर्व ४८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. आघाडीच्या सातपेक्षा जास्त जागा पाडून आंबेडकरांनी आपले अस्तित्व दाखवून दिले. आता काँग्रेस-राष्ट्रवादीलाच नव्हे, तर भाजप आणि शिवसेनेलाही त्यांची दखल घ्यावी लागणार आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही नांदेड मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याने त्यांचे अस्त्वि धोक्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Politics