काँग्रेस मुख्यमंत्र्यांची पोलखोल करणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

नाना पटोले यांची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘पोलखोल’ करण्यासाठी काँग्रेस आता पोलखोल यात्रा काढणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला काँग्रेस २० ऑगस्टपासून पोलखोल यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री जिथे जिथे गेले आणि भाषणात त्यांनी जे जे मुद्दे मांडले, त्यांची ‘पोलखोल’ करणार असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील मोझरीपासून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. नाना पटोलेही पोलखोल यात्रेची सुरुवात तिथूनच करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाषणातून विकासाचे जे दावे केले, ते किती खरे-खोटे यासाठी ही पोलखोल यात्रा असणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत विरोधकांना आव्हान दिले होते की, राज्याच्या विकासाबाबत त्यांनी चर्चा करावी. हे आव्हान नाना पटोले यांनी स्वीकारले होते; मात्र त्याला मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता नाना पटोले राज्यात फिरणार आहेत.

मुख्यमंत्री जिथे जाणार, तिथे यात्रा काढत त्यांच्या भाषणातील मुद्द्यांची पडताळणी नाना पटोले करणार आहेत. मुख्यमंत्री नेहमी भाषण करताना आकड्यांच्या आधारे माहिती देतात. हा आकड्यांचा खेळ आहे, अशी टीका विरोधी पक्षांचे नेते करतात. त्यामुळे सरकारने केलेल्या घोषणा आणि प्रत्यक्षात झालेली कामे, सरकारी आकडेवारी या बाबी काँग्रेस या पोलखोल यात्रेतून जनतेसमोर मांडणार असल्याचे पटोले म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress will defy CM