राष्ट्रीय स्तरावरील पक्ष ठाण्यात तोळामासा

राजेश मोरे
गुरुवार, 19 जानेवारी 2017

ठाणे महापालिकेत काँग्रेसचे तब्बल १८ नगरसेवक निवडून आले होते; पण त्यापैकी अनेक जणांनी इतर पक्षांचा झेंडा हाती घेतल्याने मोजकेच शिल्लक राहिले आहेत. परिणामी काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे...

राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने टीकेचे लक्ष्य करून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात उत्साह आणला आहे; पण ठाण्यातील काँग्रेसमधील दिग्गज नगरसेवकांनी इतर राजकीय पक्षांची कास धरल्याने आणि काही नगरसेवक इतर पक्षांच्या वाटेवर असल्याने त्यांची परिस्थिती ठाण्यात तोळामासा ठरली आहे. त्यातही अद्याप गटातटाचे राजकारण ऐन भरात असल्याने राष्ट्रवादीबरोबर युती झाली तरच काँग्रेसला दुहेरी आकडा गाठणे शक्‍य आहे.

ठाणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल १८ नगरसेवक निवडून आले होते; पण त्यापैकी विद्यमान नगरसेवक आणि शहर अध्यक्ष मनोज शिंदे, माजी गटनेते नारायण पवार, विक्रांत चव्हाण आदी मोजकेच पाच ते सहा आता काँग्रेसमध्ये शिल्लक राहिले आहेत. इतर नगरसेवकांनी इतर पक्षांच्या मार्गावर वाटचाल सुरू केली असल्याने काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे. निवडून आलेले नगरसेवक १८ आणि कार्यरत नगरसेवक सहा, अशी वाईट परिस्थिती ठाण्यात काँग्रेसची झाली आहे. विशेष म्हणजे, पक्षातील कार्यकर्त्यांची संख्या कमी होत असतानाही गटातटाचे राजकारण मात्र जोरात सुरू आहे. त्यामुळेच सध्या काही ज्येष्ठ नगरसेवक काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमांतून अद्याप चार हात दूरच राहत आहेत. त्यामुळे आंदोलन असो अथवा कार्यक्रम... स्थानिक नेत्यांच्या हेवेदाव्यांमुळे एकाच कार्यक्रमात उपस्थित राहणारा नेता दुसऱ्याच्या कार्यक्रमापासून दूर राहत असल्याचे चित्र आहे.

उमेदवारांची वानवा
विरोधकांनी कितीही टिकाटिप्पणी केली तरी काँग्रेसला मानणारा एक वर्ग अद्याप ठाण्यात आहे. त्याला काँग्रेसचा ‘हात’च अद्याप जवळचा आहे; पण त्यांच्या मतांसह आपल्यासाठी अतिरिक्त मतांची बेगमी करणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा या पक्षात आहे. दहा वर्षांपूर्वी दिल्लीपर्यंत येथील कार्यकर्त्यांची लॉबिंग करण्यासाठी धडपड सुरू होती, पण आजच्या घडीला १३१ प्रभागांत उमेदवार मिळविण्यासाठी अल्लाऊद्दीनचा चिराग शोधण्याची वेळ काँग्रेसच्या नेतृत्वावर आली आहे. त्यातही के. वृषाली यांच्यासारख्या सक्रिय नेत्यांना स्थानिक राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांच्याकडून थेट स्थानिक नेत्यांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. 

महिलांच्या मोर्चासाठी अथवा उपक्रमामध्ये हस्तक्षेप करणारे माजी शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नंदू मोरे यांच्यावर के. वृषाली यांनी जाहीर टिकाटिप्पणी करून महिलांना महिलांचे काम करून देण्याची जाहीर तंबी दिली होती. अशा वेळी आधीच तोळामासा प्रकृती झालेल्या काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रदेश स्तरावरील नेत्यांची ठाण्यातील नेत्यांमध्ये दिलजमाई करण्यातच अर्धी ताकद खर्ची होणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Congress will struggle for existence elections