प्रचारात सोंगाड्या, घिरट्या घालणारी घार 

प्रचारात सोंगाड्या, घिरट्या घालणारी घार 

महाड : मातोश्रीच्या घिरट्या घालणाऱ्या सुनील तटकरे यांना घरी बसवा. भरत गोगावले यांच्यासारखी सोंगाडी माणसे विधानसभेत नको. अशा सौम्य टीकेपासून सुरू झालेला रायगड जिल्ह्यातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या अंतिम टप्प्यात तर प्रचाराची पातळी घसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर वैयक्तिक टीकेपर्यंत ही पातळी पोहचली आहे. त्यातच एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप आणि टीका होऊ लागल्याने मतदारांचे मनोरंजन होत आहे. 

रायगड जिल्ह्यातील निवडणूक म्हणजे प्रचाराचा धडाका. जाहीर सभा, बैठकांमध्ये तर माइक घेतल्यानंतर वक्‍त्यांच्या अंगात जणू स्फूरण चढते. त्यानंतर सभाशास्त्र, तारतम्य यांच्या मर्यादा ओलांडल्या जातात. याची प्रचिती या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सातही मतदारसंघात पुन्हा आली. 

जिल्ह्यातील या प्रचार सभांमध्ये खासदार सुनील तटकरे आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. अनंत गीते यांनी तर थेट शरद पवारांवर शरसंधान साधले. त्यांनी या ज्येष्ठ नेत्यावर वैयक्तिक टीका केली. श्रीवर्धन, अलिबाग, तळे, रोहा येथे झालेल्या सभांमध्ये अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांनाही सोडले नाही. घोसाळकर यांच्या बाणाने भ्रष्टाचारी जरासंधाचा वध करा, असे आवाहनही तटकरे यांच्यावरील टीकेतून त्यांनी केले. मातोश्रीवर घिरट्या घालणाऱ्या तटकरे यांना घरी बसवा, अशा प्रकारचा जोरदार प्रचार गीते यांच्याकडून करण्यात आला. 

सभांमध्ये तटकरेही मागे हटले नाहीत. पराभवातून अनंत गीते वैफल्यग्रस्त झाले आहेत. घोसाळकर यांनी डॉक्‍टर पदवी विकत घेतली आहे. त्यांनी उत्तर दिल्यास निवडणुकीतून माघार घेण्याचे आव्हानही दिले. 
श्रीवर्धनमध्ये तर राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे आणि शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांच्यातील लढत अटीतटीची असल्याने सुनील तटकरे यांनाच टीकेची लक्ष्य केले जात आहे. मंत्रालयातील आग सुनील तटकरे यांनीच लावली, असा आरोप शिवसेनेचे उमेदवार घोसाळकर यांनी केला. 
अलिबागच्या सभेत अनंत गीते यांनी शेकाप आणि राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवून दमले, असा गौप्यस्फोट केला. प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या सेभेमध्ये शेकापला लक्ष केले. शेकापचे नेते रायगडात विरोधी पक्षाचे असे मोठेपणाने सांगतात; परंतु नंतर सत्तेच्या बाजूला जाऊन बसतात असाही आरोप केला. 
कॉंग्रसचे माणिक जगताप आणि आमदार भरत गोगावले यांचे द्वंदयुद्ध महाड मतदारसंघांमध्ये सातत्याने सुरू आहे. आमदार खंडणीखोर, भंगारजमा करणारे अशा प्रकारची टीका जगताप सभांमधून करत असतानाच लोकांना ताटकळत ठेवणारा आणि 12 वाजता उठणार आमदार तुम्हाला पाहिजे काय, असा प्रतिहल्ला गोगावले जगतापांवर करत आहेत. 

महाडच्या सभेत सुनील तटकरेही गोगावले यांच्यावर घसरले. सोंगाडी माणसे विधानसभेत नकोत, असा टोला त्यांनी हाणला. टीकाटीपण्णी आणि प्रचारामध्ये नेत्यांनी आपले हात धुऊन घेतले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मोह आवरता आला नाही. निवडणुकीनंतर शेतकरी कामगार पक्ष मायक्रोस्कोपने शोधावा लागेल, असे त्यांनी पेणच्या सभेत सांगितले. पवारांसोबत आता कोणीच उरले नाही, असे सांगत पवार व राहुल गांधींवर टीका केली. अलिबाग मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी आणि आमदार पंडित पाटील यांच्यातही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. पेणमध्ये भाजपचे रवीशेठ पाटील आणि आमदार धैर्यशील पाटील यांचीही जुगलबंदी सुरूच आहे. 
नेतेमंडळी एकमेकांवर चिखलफेक करत असताना जिल्ह्यात प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. 
.................... 
भावनिक मुद्द्यांना हात 
वेगवेगळ्या सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टीकाटीपण्णीद्वारे प्रचार रंगत असतानाच अशावेळी काही भावनिक मुद्देही पुढे येऊ लागले आहेत. अनवधानाने झालेल्या चुकांचे खापर मुलीच्या माथ्यावर पाडू नका, असे आवाहन तटकरे यांनी केले. मुलीला सांभाळून घ्या, असे आवाहन वरदा तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघामध्ये केले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com